

आळंदी: आळंदीला पाणीपुरवठा करण्यासाठी थेट भामा-आसखेड धरण ते आळंदी अशी सुधारित पाणी योजना करण्यात येणार आहे. यासाठी प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवा, त्याला मंजुरी देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 26) आळंदीतील कार्यक्रमात दिले. (Latest Pune News)
आळंदीतील प्रस्तावित देहूफाटा येथील भक्तनिवास इमारत बांधकाम भूमिपूजन, संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर महाद्वार ते शनी मंदिर आणि पुंडलिक मंदिर येथील दगडी घाटासाठी पुनर्निर्माण कामाचे भूमिपूजन, 50 रुपये नाममात्र दरामधील ज्ञानेश्वरी ग््रांथपारायण प्रतप्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदीत करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
आळंदी शहरात मागील 4 ते 5 वर्षांपासून पाणीपुरवठा अनियमित आणि अपुरा असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. या समस्येबाबत आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा व शिवसेना शहरप्रमुख राहुल चव्हाण यांनी उपमुख्यंत्री शिंदे यांचे लक्ष वेधले होते. शिंदेंनी तत्काळ याची दखल घेत प्रस्ताव पाठवा, मान्यता देतो, असे आश्वासन दिले.
या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, आमदार बाबाजी काळे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीरबुवा, सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, उपनेते इरफान सय्यद, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुकाप्रमुख नीलेश पवार, युवासेना तालुकाप्रमुख विशाल पोतले, शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, माजी सभापती डी. डी. भोसले पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, सागर भोसले, सचिन गिलबिले, दिनेश घुले, भागवत आवटे व वारकरी भाविक व आळंदीक ग्रामस्थ उपस्थित होते.
आळंदी शहराला भामा-आसखेड धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठीची सुधारित पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली असून, ती तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवली आहे. यासाठी 350 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपालिका