Khadakwasla Encroachment Demolition Pudhari
पुणे

Khadakwasla Encroachment Demolition: आलिशान रिसॉर्ट, बंगल्यांवर जलसंपदा विभागाचा 'हातोडा'

पानशेत, वरसगाव, खडकवासला पाणलोट क्षेत्रात धडक मोहीम; कारवाई थांबवण्यासाठी पैशांची आमिषे, पण 'दबंग' अधिकारी ठाम, 'सर्व बांधकाम भुईसपाट होईपर्यंत मोहीम सुरूच'.

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला : मागील तीन आठवड्यात खडकवासला जलसंपदा विभागाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात पानशेत, वरसगाव व खडकवासला धरण क्षेत्रासह मुठा कालव्यावरील पाचशेहून अधिक बेकायदा बांधकामे भुईसपाट केली आहेत. या धडक मोहिमेत खडकवासला धरण चौपाटी व इतर ठिकाणच्या अडीचशेहून अधिक टपऱ्याही हटवल्या आहेत.

खडकवासला धरण तीरावरील पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात दूर झाली आहे. खडकवासला, वरसगाव, पानशेत धरण परिसरासह खडकवासला धरणाखालील मुठा कालवा रस्ता, कालव्याचा परिसर, मुख्य पुणे-पानशेत रस्त्यावरील बेकायदा बांधकामे, टपऱ्या, दुकाने अशा अतिक्रमणांवर हातोडा मारला आहे.

सर्वाधिक कारवाई खडकवासला धरण क्षेत्रात केली आहे. खडकवासला, गोऱ्हे बुद्रुक, कुडजे, मांडवी खुर्द आदी ठिकाणी आलिशान बंगल्याची पाणलोट क्षेत्रातील बेकायदा बांधकामे, हॉटेल, रिसॉर्ट अतिक्रमणे भुईसपाट करून जलसंपदा विभागाच्या सरकारी मालकीची जमीन मोकळी करण्यात आली.

खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांच्या नेतृत्वात जेसीबी मशिनसह पथकाने अतिक्रमणे भुईसपाट करण्याची धडक मोहीम सुरू केल्याने हॉटेल, रिसॉर्ट, फार्म हाऊस, टपऱ्या मालकांनी स्वतःहून बांधकामे काढण्यास सुरुवात केली तर काहींनी मुदत मागितली आहे.

बेकायदा बांधकामे भुईसपाट होईपर्यंत कारवाई

पुणे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, पुणे पाटबंधारे मंडळ तसेच खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे, शाखाधिकारी गिरीजा कल्याणकर, प्रतीक्षा मारके, रोहन ढमाले, सुमीत धामणे आदी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, पुणे ग््राामीणचे पोलिस अधीक्षक यांच्या सहकार्याने व जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. सर्व बेकायदा बांधकामे भुईसपाट करेपर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

अतिक्रमणधारकांनी घेतला धसका

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात सुरू असलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दबंग कारवाईचा मोठा धसका खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण परिसरातील अतिक्रमणधारकांनी घेतला आहे. बड्या राजकीय नेत्यांसह उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी थेट दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रातच बेकायदा आलिशान रिसॉर्ट, हॉटेल, बंगले उभारले आहेत. राज्य सरकारने जलसंपदा विभागाला अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिस, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, भूमिअभिलेख आदी विभागांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रथमच जलसंपदा विभागाच्या अतिक्रमण कारवाईत विविध विभागांचे अधिकारी, सुरक्षारक्षक कर्मचारी सहभागी झाले आहेत.

कारवाई थांबवण्यासाठी दाखवली पैशांची आमिषे

तिन्ही धरणांच्या तीरावरून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सरकारी मालकीच्या जमिनीवर बांधलेले बंगले, हॉटेल, रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली. काही बंगले, हॉटेल मालकांनी पैशांची आमिषे दाखवली. मात्र, त्याला न जुमानता कारवाई सुरू आहे. कारवाईला स्थगिती देण्यात यावी, यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. मात्र, मंत्री, नेते मंडळी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय असल्याने वरिष्ठ पातळीवरून कोणीही दखल घेत नसल्याचे चित्र आहे.

मागील तीन आठवड्यांपासून पाचशेहून अधिक बेकायदा बांधकामांवर कारवाई केली आहे. पानशेत, वरसगाव, खडकवासला धरण क्षेत्रातील सरकारी जमिनीवरील तसेच पुणे शहर हद्दीतील कालव्यालगतची बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT