

नसरापूर : गॅस सिलिंडरच्या स्फोटात संपूर्ण कौलारू घर बेचिराख झाले आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्याने जीवनावश्यक वस्तू जळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घर अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे धाडकन कोसळलं.
एका सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. जळीतग्रस्तांच्या हातात आता राहिली आहे फक्त राख आणि माती. दीडघर (ता. भोर) येथे कौलारू घर जळाल्याची घटना मंगळवारी (दि. 2) सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. यमुना रघुनाथ बांदल आणि दिनेश काशीनाथ बांदल यांची घरे जळून घरातील साठवलेले गहू, तांदळाचे कट्टे, कडधान्य, कपडे-लत्ते, रोकड व साडेपाच तोळे सोने आणि घर असे 10 लाखांचे नुकसान झाले. घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे.
पुण्यावरून पाचारण केलेल्या दोन अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. गॅस सिलिंडरच्या स्फोटात संपूर्ण घराला आगीने वेढले होते. भेदरलेल्या ग्रामस्थांनी पाणी टाकून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी मंडलाधिकारी प्रदीप जावळे, तलाठी सचिन ढोरे, ग्रामपंचायत अधिकारी सरला नलावडे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.
दोन पिढ्याचं दणकट असलेलं अख्खं घर जळून खाक झालं. आगीमुळे तुळई, दरवाजे, खिडक्या कोसळून एका क्षणात बेचिराख झाल्या आणि भिंतीतून निघणाऱ्या प्रत्येक धुरांच्या लोटाबरोबर उपस्थितांचे डोळे पाणवले.
दीडघर (ता. भोर) येथे गॅस सिलिंडरस्फोटात बेचिराख झालेले घर. (छाया : माणिक पवार)