

पुणे : कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ टोळीच्या गुंडाकडे कोथरूड पोलिसांना गोळीबार केलेल्या पुंगळ्यांसह 400 काडतुसे सापडली आहेत.
त्यात 200 रिकाम्या पुंगळ्या असून, 200 जिवंत काडतुसे आहेत. त्याने त्यातील पिस्तुलातून गोळ्या झाडण्याचा सराव लोणावळा येथील शेतात केला. त्यानंतर त्याने घायवळला काडतुसे दिल्यानंतर घायवळने अहिल्यानगर येथील सोनाई गावच्या शेतात गोळ्या झाडण्याचा सराव केल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
अजय महादेव सरोदे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या कोथरूड गोळीबार प्रकारानंतर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात या गुंडाला नुकतीच अटक केली असून, कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या गुंडांनी 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या वेळेत एका तरुणावर गोळीबार केला होता. त्यानंतर 20 मिनिटांच्या अंतराने त्यांनी एका तरुणावर
कोयत्याने वार करीत खुनाचा प्रयत्न केला. या दोन्ही प्रकरणात स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, याप्रकरणी घायवळ आणि त्याच्या साथीदारां विरुद्ध मकोकाअंतर्गत कारवाई केली आहे. घायवळ सध्या लंडनला फरार असून, त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना आरोपी अजय सरोदे हा घटनास्थळी असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे कोथरूड पोलिसांनी सरोदेला अटक केली. अटकेनंतर त्याची चौकशी करत त्याच्या घराची झडती घेतली असता 400 काडतुसे पोलिसांना सापडली.
त्यातील दोनशे काडतुसांच्या रिकाम्या पुंगळ्या आहेत. तर, दोनशे जिवंत काडतुसे आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. अजय सरोदेकडील काडतुसे
खडकी येथील दारूगोळा कारखान्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही काडतुसे त्याने कधी आणि कशी आणली, याचा तपास केला जात आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.