

गणेश खळदकर
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेला 2 लाख 50 हजार 537 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. येत्या 28 डिसेंबरला संबंधित परीक्षा घेण्यात येणार असून, राज्यातील 35 संवेदनशील केंद्रांवर राज्य परीक्षा परिषद विशेष लक्ष ठेवणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याचे गेल्या वर्षीच्या परीक्षेतून लक्षात आले. यामध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. अशा केंद्रांवर परीक्षा परिषद लक्ष ठेवून आहे. साधारण अशा 35 केंद्रांची निवड केली असून, काही विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित अधिकारी परीक्षेच्या दिवशी त्या परीक्षा केंद्रांना अचानक भेट देतील.
इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्तीसाठी परीक्षा घेतली जाते. परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 21 डिसेंबरला होणार होती. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने महाराष्ट्र अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 21 डिसेंबरला आयोजित करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे एनएमएमएस परीक्षा आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी येत असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर, राज्य परीक्षा परिषदेने एनएमएमएस शिष्यवृत्तीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित परीक्षेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी संबंधित योजनेतून वर्षाला 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते.
बौद्धिक क्षमता चाचणी व शालेय क्षमता चाचणी अशा दोन विषयांच्या पेपरचा समावेश असतो. पहिला पेपर मानसशास्त्रीय चाचणीत कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन आदी संकल्पनांवर, तर दुसरा पेपर हा अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, भूगोल, इतिहासचा समावेश आहे. प्रत्येक पेपर 90 गुणांसाठी असतो. ज्यासाठी पात्रता गुण 40 टक्के मिळणे आवश्यक असते. एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 32 टक्के गुण असा निकष आहे.
राज्यातील साधारण 35 केंद्रांवर वॉच ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी काही अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असून, संबंधित अधिकारी त्या केंद्रांना अचानक भेटी देऊन त्या केंद्रांवर संबंधित परीक्षा योग्य पद्धतीने पार पडत आहे का याची पाहणी करणार आहेत. कारण संबंधित केंद्रांवर गैरप्रकार होत असल्याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे अशा परीक्षा केंद्रांची आम्ही यादी तयार केली असून, आता होणाऱ्या परीक्षेत या परीक्षा केंद्रांवर आमची करडी नजर राहणार आहे.
डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद