खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा
पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिसांनी टेम्पोमधून वाहतूक करण्यात येणारा गुटखा शुक्रवारी (दि. २१) पहाटेच्या सुमारास पकडला. या गुटख्याची किंमत १४ लाख १७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गुटखा जप्त केला असून, याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानाराम मिश्रीलाल चौधरी (वय ३२) आणि देवेंद्र गणपतलाल मेघवाल (वय २५, दोघेही रा. वडगाव, हवेली; मूळ रा. मांडा, ता. मारवाड दक्षिण, जि. पाली, राजस्थान) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत राजगड पोलिसांनी सांगितल्यानुसार, एक गुटखा वाहतूक करणारा टेम्पो शुक्रवारी पहाटे पुणे-सातारा रस्त्याने पुण्याच्या बाजूला जाणार असल्याची माहिती राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक फौजदार कृष्णा कदम, पोलिस हवलदार अजित माने आणि पोलिस नाईक तुषार खेंगरे
यांच्या पथकाने खेड शिवापूर टोल नाक्याजवळ सापळा रचला होता.
मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा एक टेम्पो पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पुण्याच्या दिशेने जाताना निदर्शनास आला. या वेळी टेम्पोची तपासणी केली असता त्यात १४ लाख १७ हजार ५०० रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूची पोती आढळून आली. हा सर्व माल आणि टेम्पो राजगड पोलिसांनी ताब्यात घेऊन जप्त केला आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे तपास करीत आहेत.
Pune Crime : दोन मित्र आपापसात भिडले; एकाने हत्यार चालवले, दुसऱ्याकडून फायरिंग, एकाचा जागीच मृत्यू