Why I Killed Gandhi : अमोल कोल्हेंच्या नथूराम गोडसे भूमिकेवरून राष्ट्रवादीचे नेते नाराज  | पुढारी

Why I Killed Gandhi : अमोल कोल्हेंच्या नथूराम गोडसे भूमिकेवरून राष्ट्रवादीचे नेते नाराज 

मुंबई, पुढारी ऑनलाईन : अभिनेते अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा मुख्य गुन्हेगार असलेल्या नथूराम गोडसे यांची भूमिका साकारलेल्या ‘Why I Killed Gandhi’ चित्रपटावरून राजकीय वातावरणात आणि समाज माध्यमांवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. खास करून या वादग्रस्त चित्रपटाच्या टिजरवरून राष्ट्रवादी नेमकी कोणती भूमिका घेणार आहे, यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अंकुश काकडे यांनी आपापले आक्षेप नोंदविले आहेत.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांना ट्विट करून याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणाले, “अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही”, असं स्पष्ट मत आव्हाडांनी मांडलं आहे. (Why I Killed Gandhi)

अंकुश काकडे काय म्हणाले?

राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले की, “अमोल कोल्हे यांचं स्टेटमेंट तुम्ही वाचून दाखवलं. ते कलाकार म्हणून त्यांना ते पटत असलं तरी एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करताना आपली काही जबाबदारी असते. कलाकार हा राजकीय, धार्मिक, सामाजिक या सगळ्यांपेक्षा वरचढ असतो हे मान्य केलं, तरी ज्यावेळेला आपण एखाद्या पक्षाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम करतो त्यावेळेला आपली जबाबदारी असते. त्या पक्षाच्या विचारधारेशी सुसंगत अशीच आपली वागणूक असली पाहिजे.”

“अमोल कोल्हे यांनी आज किती जरी सांगितलं तरी ते आज एका पक्षात खासदार म्हणून काम करतात. अशावेळी त्यांची ही भूमिका योग्य नाही. त्यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न अशीच असावी. अर्थात त्यांनी वैयक्तिरित्या काय करणं हा त्यांचा प्रश्न आहे. तरी महात्मा गांधींचा ज्याने खून केला त्याची भूमिका करणं हे कोणत्याही भारतीयासाठी योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार म्हणून काम करणाऱ्या माणसाला तसा अधिकार निश्चित नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी माझी योग्य ती भूमिका त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवेल. त्यांना तो चित्रपट प्रदर्शित होऊ नये, अशी विनंती करेन”, असंही अंकुश काकडे यांनी मत मांडलं आहे.

अमोल कोल्हे काय म्हणतात?

“२०१७ साली या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. ज्यावेळी कोणत्याही सक्रिय राजकारणात नसताना मी ही भूमिका साकारली होती. एखादी भूमिका करतो म्हणजे त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे कलाकार म्हणून कधीच नसते. काही विचारांसोबत आपण सहमत असतो. तर काही विचारधारांसोबत सहमत नसतानाही आपण ती भूमिका करतो. माझ्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातसुद्धा नथुराम गोडसेचे उदात्तीकरणाच्या संदर्भात मी कधीही भूमिका घेतलेली नाही. केवळ एक कलाकार म्हणून भूमिका साकारणे आणि त्याचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडला जाणे या दोन विभिन्न गोष्टी आहेत”, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हेंनी दिलं आहे.

Back to top button