Pune Crime : दोन मित्र आपापसात भिडले; एकाने हत्‍यार चालवले, दुसऱ्याकडून फायरिंग, एकाचा जागीच मृत्‍यू - पुढारी

Pune Crime : दोन मित्र आपापसात भिडले; एकाने हत्‍यार चालवले, दुसऱ्याकडून फायरिंग, एकाचा जागीच मृत्‍यू

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

दोन दिवसांपूर्वी झालेल्या (Pune Crime) वादातून दोन मित्र आपसात भिडले. यावेळी एकाने धारदार हत्यार चालवले. तर, दुसऱ्याने मित्रावर तीन राऊंड फायर केले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथे घडली.

रोहन येवले (वय २१, रा. आढले खुर्द, मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अविनाश भोईर (२३, रा. आढले खुर्द, मावळ) हा गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी अविनाश भोईर आणि मृत रोहन येवले हे एकाच गावातील असून, चांगले मित्र होते. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांच्यात पुन्हा वाद पेटला. त्यावेळी रोहन याने अविनाशवर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. (Pune Crime) अविनाश यानेही रोहनवर तीन राऊंड फायर केले. यामध्ये जखमी झालेल्या रोहनला सोमाटने फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

तर, अविनाश यांच्यावर हिंजवडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यातील वादाचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेमुळे आढले गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात आणि रुग्णालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Back to top button