बारामती : बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांतील सर्व जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसने पटकाविल्या. भाजपने येथे चार जागी उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय बहुजन समाज पक्षालाही कोणताही करिश्मा दाखवता आला नाही. पंचायत समितीच्या १२ पैकी २ जागा राष्ट्रवादीने भाजपला सोडल्या होत्या. त्यामुळे पंचायत समितीत राष्ट्रवादीला १२ पैकी १० व भाजपला दोन जागा मिळाल्या.
दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी बारामतीत एकत्रित लढल्या. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला एकही जागा दिली गेली नव्हती. परंतु, त्यांचा पक्ष अजित पवार यांच्या पक्षासोबत होता. या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मतदारांनी भरभरून साथ दिली.
जिल्हा परिषद गटनिहाय निकाल :
सुपा गटामध्ये राष्ट्रवादीच्या पल्लवी प्रमोद खेत्रे ह्या १४,५५३ मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांना १८,०९५ मते मिळाली. अपक्ष उमेदवार मोहिनी गणेश खैरे यांना ३,५४२ मते मिळाली. भाजपच्या वंदना विशाल कोकरे येथे तिसऱ्या स्थानी राहिल्या. त्यांना २,६७७ मते मिळाली.
गुणवडी गटामध्ये राष्ट्रवादीच्या शुभांगी कचेर शिंदे १७,२४९ मतांनी विजयी झाल्या. शिंदे यांना १८,४५३ मते मिळाली, तर पराभूत बसपच्या ऊर्मिला प्रवीण शिंदे यांना १,२०४ मते मिळाली.
पणदरे गटातून राष्ट्रवादीचे मंगेश प्रतापराव जगताप हे १७,५३६ मतांनी विजयी झाले. जगताप यांना २०,८०० मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुरज अरविंद जगताप यांना ३,२६४ मते मिळाली.
वडगाव निंबाळकर गटातून राष्ट्रवादीच्या रोहिणी संदीप कदम (ढोले) ह्या २१,५३६ मतांनी विजयी झाल्या. रोहिणी कदम यांना २२,५७२ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या पराभूत उमेदवार आरती मधुकर लोखंडे यांना १,०३६ मते मिळाली.
निंबुत गटातून राष्ट्रवादीचे करण संभाजीराव खलाटे हे १९,५२४ मतांनी विजयी झाले. खलाटे यांना २२,१८१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत भाजप उमेदवार दिग्विजय वसंतराव काकडे यांना २,६५७ मते मिळाली.
निरावागज गटातून राष्ट्रवादीच्या शिवानी अभिजित देवकाते ह्या २०,५४४ मतांनी विजयी झाल्या. देवकाते यांना २१,६१३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत अपक्ष उमेदवार रोहित राजू भोसले यांना १,०६९ मते मिळाली.
पंचायत समितीतही राष्ट्रवादी
बारामती पंचायत समितीच्या १२ जागांपैकी १० जागा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या. निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने भाजपसाठी सुपे व शिर्सुफळ गणातील दोन जागा सोडत तेथे उमेदवार दिले नव्हते. त्या जागा भाजपच्या पदरात पडल्या. यानिमित्ताने अनेक वर्षांनंतर बारामतीत भाजपच्या चिन्हावरील उमेदवार विजयी झाले. अन्य दहा ठिकाणी मात्र राष्ट्रवादीने एकतर्फी विजय मिळविला.
पंचायत समिती गणनिहाय निकाल :
सुपा गणातून भाजपच्या उज्ज्वला पोपट खैरे ह्या २,६६९ मतांनी विजयी झाल्या. खैरे यांना ७,४६६, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पराभूत अपक्ष उमेदवार मनीषा हनुमंत चांदगुडे यांना ४,७९७ मते मिळाली.
काऱ्हाटी गणातून राष्ट्रवादीच्या शामल सुनील वाबळे ह्या ७,३०४ मतांनी विजयी झाल्या. वाबळे यांना ९,५३३ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या पराभूत उमेदवार सोनाली प्रमोद खराडे यांना २,२२९ मते मिळाली.
शिर्सुफळ गणातून भाजपचे अनिकेत प्रभाकर गावडे हे ३,८०६ मतांनी विजयी झाले. गावडे यांना ६,५४९, तर प्रतिस्पर्धी पराभूत मनसेचे उमेदवार पोपटराव सुरेश सूर्यवंशी यांना २,७४३ मते मिळाली.
गुणवडी गणातून राष्ट्रवादीच्या शुभांगी सुनील आगवणे ह्या ८,८६६ मतांनी विजयी झाल्या. आगवणे यांना ९,३५२ मते मिळाली. प्रतिस्पर्धी बसपच्या पराभूत उमेदवार दिव्या बाळासो कांबळे यांना ४८६, तर भाजपच्या नीलम राजेंद्र शिंदे यांना येथे ३८६ मते मिळाली.
पणदरे गणातून राष्ट्रवादीचे किरण रावसाहेब तावरे हे ६,२७० मतांनी विजयी झाले. तावरे यांना ८,५१५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे मच्छिंद्र मनोहर तावरे यांना २,२४५ मते मिळाली.
मुढाळे गणातून राष्ट्रवादीच्या वैशाली अशोक कोकणे ह्या ९,२१९ मतांनी विजयी झाल्या. कोकणे यांना १०,३४६ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या पराभूत उमेदवार पौर्णिमा सोमनाथ निंबाळकर यांना १,१२७ मते मिळाली.
मोरगाव गणातून राष्ट्रवादीचे बाबा रामा चोरमले १०,८३३ मतांनी विजयी झाले. चोरमले यांना ११,४९१ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे पराभूत उमेदवार रामदास चंद्रकांत नवले यांना ६५८ मते मिळाली.
वडगाव निंबाळकर गणातून राष्ट्रवादीचे जितेंद्र भगवान पवार ९,९०३ मतांनी विजयी झाले. पवार यांना १०,४९२ मते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी पराभूत अपक्ष उमेदवार असिफ लतिफ शेख यांना ६१२ मते मिळाली.
निंबुत गणातून राष्ट्रवादीचे दिग्विजय धन्यकुमार जगताप हे ६,९२० मतांनी विजयी झाले. जगताप यांना ८,६४० मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे पराभूत उमेदवार प्रकाश किसन जगताप यांना १,७२० मते मिळाली.
कांबळेश्वर गणातून राष्ट्रवादीच्या आशाबाई विठ्ठल वायाळ ह्या ११,६३४ मतांनी विजयी झाल्या. वायाळ यांना १२,३५० मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या लैला नजीर शेख यांना ७१६ मते मिळाली.
निरावागज गणातून राष्ट्रवादीचे नितीन अरुण काकडे हे १०,४९० मतांनी विजयी झाले. त्यांना १०,९८५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार राज भरत कांबळे यांना ४९५ मते मिळाली.
डोर्लेवाडी गणातून राष्ट्रवादीच्या राजश्री भूषण टकले ह्या ९,९६६ मतांनी विजयी झाल्या. टकले यांना १०,८४३ मते मिळाली. प्रतिस्पर्धी पराभूत अपक्ष उमेदवार कल्याणी सुजितकुमार वाघमोडे यांना ८७७ मते मिळाली.
दोन महिलांना सर्वाधिक मताधिक्य
बारामती तालुक्यात वडगाव निंबाळकर गटातून रोहिणी संदीप कदम (ढोले) ह्या सर्वाधिक २१,५३६ मताधिक्याने विजयी झाल्या, तर पंचायत समिती निवडणुकीत कांबळेश्वर गणातून आशाबाई विठ्ठल वायाळ ह्या ११,६३४ एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्या.