Satara ZP Election Result: नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य आपटणार की निवडून येणार?

मंत्री, आमदार, माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
Satara ZP Election Result
Satara ZP Election Result: नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य आपटणार की निवडून येणार?Pudhari Photo
Published on
Updated on

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणांगणात मंत्री, माजी मंत्री, आमदार, माजी आमदारांच्या कुटुंबातील व्यक्ती उभ्या असल्याने त्यांच्या जय-पराजयाची उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला लागून राहिली आहे. हे सदस्य आपटणार की येणार, याचा आज निकाल लागणार आहे. एका ठिकाणी तर दोन जावांमध्येच द्वंद्व असल्याने या निकालातून नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे काय होणार, अशी चर्चा जोरदारपणे सुरू आहे.

कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ. प्रिया शिंदे यांनी भाजपकडून खटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राहुल पाटील यांनी त्यांना आव्हान दिले आहे. राहुल पाटील हे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचे जावई आहेत. पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या प्राची नरेंद्र पाटील यांनी निवडणूक लढवली. त्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या पत्नी आहेत. शिवसेनेकडून मृणाल पाटील यांनी त्यांना आव्हान दिले होते.

वाईचे माजी आमदार मदनदादा भोसले यांची मुलगी डॉ. सुरभी भोसले या पंचायत समितीच्या रिंगणात उतरल्या आहेत. भुईंज पंचायत समिती गणातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ॲड. शितल वारागडे यांनी आव्हान उभे केले आहे. कराडमध्ये येळगाव जिल्हा परिषद गटातून दिवंगत नेते, माजी मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध विलासकाकांचे पुतणे आनंदराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली.

औंध जिल्हा परिषद गटातून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे थोरले बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनिषा फडतरे यांनी निवडणूक लढवली आहे. आंधळी जिल्हा परिषद गटातून जयकुमार गोरे यांचे धाकटे बंधू शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे निवडणूक लढवली, त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या दिपाली जगदाळे यांनी आव्हान उभे केले आहे. माण तालुक्यातील मार्डी जिल्हा परिषद गटात दिवंगत नेते सदाशिव पोळ यांच्या कुटुंबातील व्यक्तींमध्येच लढत होतेय. सोनल मनोजकुमार पोळ या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत आहेत. तर, भाजपकडून भारती संदीप पोळ निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या जावांमधील कुणीही जिंकले तरी जिल्हा परिषदेचा गट हा पोळ कुटुंबाच्या ताब्यात राहणार आहे. फक्त राष्ट्रवादी की भाजप विजयी होणार? याची उत्सुकता आहे.

फलटणचे दिवंगत आमदार चिमणराव कदम यांचे चिरंजीव सह्याद्री कदम देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सह्याद्री कदम यांनी कोळकी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली, त्यांच्यासमोर भाजपच्या जयकुमार शिंदे यांचं आव्हान होतं. विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढलेल्या अरुणादेवी पिसाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बावधन जिल्हा परिषद गटातून अरुणादेवी पिसाळ यांच्या कन्या दिप्ती पिसाळ यांनी भाजपकडून निवडणूक लढवली. दिप्ती पिसाळ या माजी मंत्री मदनआप्पा पिसाळ यांच्या नात व जिल्हा परिषदेचे माजी कृषि सभापती शशिकांत पिसाळ यांच्या कन्या आहेत. त्यांच्या विरोधात लढणाऱ्या ऋतुजा शिंदे यांचे सासरे अनेक वर्षे किसन वीर कारखान्याचे संचालक राहिले आहेत. तसेच त्यांचे पती विराज शिंदे हेही राजकारणात अनेक वर्षे सक्रिय आहेत. या परिस्थितीमध्ये बावधन गटातील मतदारांनी कोणाला कौल दिला आहे? याबाबत उत्सुकता आहे.

पुसेसावळी जिल्हा परिषद गटात भाजपचे निवडणूक प्रभारी धैर्यशिल कदम यांची भावजय तेजस्विनी विक्रमशिल कदम या निवडणूक रिंगणात असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या रिया पिसाळ यांनी निवडणूक लढवली आहे. सोनके पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांचे चिरंजीव आकाश सोळस्कर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे धनंजय धुमाळ निवडणूक रिंगणात आहेत. खेड बु॥ जिल्हा परिषद गटात स्व. अविनाश धायगुडे-पाटील यांचे चिरंजीव ऋषिकेश धायगुडे भाजपमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून गणेश धायगुडे तर शिवसेनेतून नंदकुमार घाडगे निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेत्यांच्या घरांमधील नेत्यांचे काय होणार? याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news