विनोद सावंत
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी चुरशीने मतदान झाले आहे. यामध्ये पुरुषांप्रमाणे महिला मतदारांनीही रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिलांचे मतदान जास्त झाल्याची नोंद आहे.
जिल्हा परिषदेच्या 68 गट व पंचायत समितीच्या 136 गणांसाठी शनिवारी (दि. 7) 74.45 टक्के मतदान झाले. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 86 टक्के, तर सर्वात कमी आजरा तालुक्यात 63.90 टक्के मतदान झाले.
महिला मतदारांचा कौल कोणाला?
जिल्ह्यात 8 लाख 46 हजार 586 महिलांनी मतदान केले आहे. यामध्ये आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान जास्त झाले आहे. महायुतीने राज्यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना, एसटी बस तिकिटात 50 टक्के सवलत योजना आणली. विधानसभा, महापालिकेच्या निवडणुकीत याचा महायुतीला फायदा झाला. या निवडणुकीतही काय होणार, हे आज दुपारी 1 वाजेपर्यंत स्पष्ट होईल.
महिला मतदानात करवीर टॉपवर
जिल्ह्यातील 12 तालुक्यांत सर्वाधिक 4 लाख 8 हजार 174 इतके मतदान करवीर तालुक्यात होते. याच तालुक्यात सर्वाधिक 1 लाख 54 हजार 160 महिलांनी मतदान केले आहे. त्या खालोखाल हातकणंगले तालुक्यात 1 लाख 23 हजार 800 महिलांनी मतदान केले आहे.