

पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 13 पंचायत समित्यांसाठी शनिवारी 68.89 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी जि. प.च्या 73 गटांसाठी 299 उमेदवार, तर पं. स.च्या 146 गणांसाठी 528 उमेदवार रिंगणात होते. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सर्वाधिक मतदान राजगड (वेल्हा) तालुक्यात 79.30 टक्के, तर सर्वात कमी बारामती तालुक्यात 54.90 टक्के झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शोकाकुल वातावरण असल्याने बारामती तालुक्यात मतदानाचा टक्का गतवर्षीच्या तुलनेत कमी राहिला आहे. दरम्यान, मतमोजणी सोमवारी (दि. 9) होणार आहे.
जि. प. व पं. स. निवडणुकीसाठी प्रचार जोमात सुरू होता. मात्र, दुर्दैवाने बारामती येथे प्रचाराला जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे वातावरण बदलले. यानंतर राष्ट्रवादी काँग््रेाससह सर्व पक्षांनी व उमेदवारांनी जाहीर प्रचार टाळला. केवळ कोपरा सभा आणि वैयक्तिक गाठीभेटी घेऊन पत्रके वाटण्यात आली. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जवळपास विनाप्रचार पार पडली.
झेडपी आणि पं. स.च्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 70.35 टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर ’मॉक पोल’ घेण्यात आला. यावेळी 40 ठिकाणची मतदान यंत्रे सुरू झाली नाहीत. ती बदलून मॉक पोल घेण्यात आला आणि त्यानंतर मतदानाला सुरुवात करण्यात आली.
जिल्ह्यात सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पहिल्या दोन तासांत म्हणजे साडेनऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 7.74 टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासांत मावळ, भोर आणि आंबेगाव तालुक्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. या तीन तालुक्यांत सरासरी आठ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. त्यानंतर साडेअकरा वाजता जिल्ह्यात सरासरी 21.16 टक्के, तर दुपारी दीड वाजता 36.67 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक मतदान मावळ तालुक्यात 42.11 टक्के, तर भोर तालुक्यात 41.48 टक्के झाले. दीड ते साडेतीन वाजण्याच्या काळात मतदानाचा वेग वाढला. साडेतीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 51 टक्के मतदान झाले. मतदान संपेपर्यंत एकूण 68.89 टक्के मतदानाची नोंद झाली. 2017 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जिल्ह्यात 70.35 टक्के मतदान झाले होते.
ही निवडणूक 3,605 मतदान केंद्रांवर पार पडली. यासाठी आवश्यकतेपेक्षा चारपट अधिक यंत्रांचे वाटप करण्यात आले होते. या मतदान केंद्रांसाठी 7,931 बॅलेट युनिटची आवश्यकता असताना 14,318 युनिट वाटप करण्यात आली. तसेच 3,966 कंट्रोल युनिटची आवश्यकता असताना 5,813 युनिटचे वाटप करण्यात आले. त्यामुळे ज्या ठिकाणी मतदान यंत्र बंद पडले, तेथे अवघ्या 15 ते 20 मिनिटांत नवीन यंत्र उपलब्ध करून देण्यात आले.