पंचवटी; पुढारी वृत्तसेवा: कोरोनासह साथरोगांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना विमाकवच देण्याचा निर्णय नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे बाजार समितीशी संलग्न असलेल्या तब्बल ३ हजार १०० सदस्यांना विमासंरक्षण मिळणार आहे.
उपसभापती प्रभाकर मुळाणे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती प्रभाकर मुळाणे, संचालक दिलीप थेटे, तुकाराम पेखळे याच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बाजार समिती आडते व व्यापारी यांच्याकडून वसूलपात्र असणारी मार्केट फी महिन्याच्या ७ तारखेपर्यत वसूल करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
यानंतर विम्याचा विषय घेण्यात आला. यात कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या नाशिक, त्र्यंबक व पेठ या तीन तालुक्यांतील विविध कार्यकारी सोसायट्या व ग्रामपंचायत यात जवळपास ३ हजार १०० सदस्य आहेत.
या सर्व सदस्यांना प्रत्येकी पाच लाखांचे विमाकवच देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
या विम्याच्या हप्त्याची रक्कम बाजार समिती भरणार असून, येत्या २० सप्टेंबरपर्यंत सर्व सदस्यांनी बाजार समितीकडे आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन सभापती पिंगळे यांनी केले आहे.
अंगावर झाड पडणे, विहिरीत पडून मृत्यू, तलावात पडून मृत्यू, शेतात काम करत असताना व इतर ठिकाणी सर्पदंशाने होणारे मृत्यू, पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू अथवा वाहन अपघातात मृत्यू झाल्यास विमाकवच असलेल्या व्यक्तीच्या पश्चात वारसास पाच लाख रूपये, अपघाती अपंगत्व आल्यास अडीच लाख रूपये, उपचारासाठी एक लाख रूपये रक्कम मिळणार आहे.
हेही वाचलं का?
संचालकांसह गुजरात दौऱ्यावर असताना राजकोट येथील गोंदल बाजार समितीस भेट दिली होती. यावेळी तेथील संचालकांशी केलेल्या चर्चेत बाजार समितीशी संलग्न असलेल्या सर्वच सभासदांचा विमा त्यांनी काढल्याचे लक्षात आले. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत असा निर्णय घेण्याचे आम्ही ठरवले. सर्व संचालकांशी बोलून आजच्या सभेत त्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. आगामी काळात बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील विमाकवच देण्याचा मानस आहे.
– माजी खासदार देविदास पिंगळे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक)