यवतमाळ जिल्हा पाऊस अपडेट : अरुणावतीचे पाच तर बेंबळा धरणाचे १६ दरवाजे उघडले | पुढारी

यवतमाळ जिल्हा पाऊस अपडेट : अरुणावतीचे पाच तर बेंबळा धरणाचे १६ दरवाजे उघडले

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ जिल्हा पाऊस अपडेट – यवतमाळ जिल्ह्याला पावसाने पुन्हा झोडपले आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बाभूळगाव, कळब आणि केळापुर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळापूरमध्ये ६५ कळबमध्ये ९३ तर बाभुळगाव तालुक्यात ११२.७ मिमी एवढा विक्रमी पाऊस कोसळला. इतर तालुक्यातही पावसाचा जोर कायम होता.

मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. सोमवारी यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

रात्री उशिरापर्यंत पाउस कोसळत होता. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

यवतमाळ जिल्हा पाऊस अपडेट : प्रमुख प्रकल्प तुडुंब भरले

मागील चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहे. अरुणावती, बेंबळासह प्रमुख प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

अरुणावतीचे पाच तर बेंबळाचे १६ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याशिवाय गोकी, वाघाडी नवगाव, बोरगाव, आणि सायखेडा धरण भरले आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. वाढती पाणीपातळी लक्षात घेता नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आहे.

पुराच्या पाण्यात तिघे वाहून गेले

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्‍यात दोन तर बाभूळगावात एक जण पुराच्या पाण्यात वाहून गेला.

महागाव तालुक्याच्या काळी (दौ) वसंतनगर मार्गावरील नाल्याच्या पुरात ज्ञानेश्वर मांगीलाल जाधव (२८) व सुरेश सुभाष मेश्राम (२७)रा.साई (इजारा) हे दोघे वाहून गेले. बाभूळगाव तालुक्यातील राणी अमरावती येथील संतोष पारिसे (३५) हा यावली नाल्याच्या पुरात वाहून गेला.

Back to top button