Nagar Onion Crop Decline Pudhari
अहिल्यानगर

Nagar Onion Crop Decline: कांद्याचे आगार संकटात! अतिवृष्टी, खर्च आणि गडगडलेल्या भावांमुळे नगर तालुक्यात शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे पाठ

'कांद्याचे पठार' म्हणून ओळख असलेल्या भागातच लागवडीत मोठी घट; वैतागून शेतकऱ्यांनी उभ्या पिकात घातला नांगर; शेतकरी आता गहू-हरभरा यांसारख्या पर्यायी पिकांकडे वळले.

पुढारी वृत्तसेवा

शशिकांत पवार

नगर तालुका : नगर तालुका पूर्वी ज्वारीचे पठार म्हणून ओळखला जायचा. परंतु गेल्या दोन दशकांपासून तालुक्यात गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार विक्रमी कांदा उत्पादन होत होते.

नगर तालुक्याला राज्यात कांद्याचे पठार म्हणून नव्याने ओळख प्राप्त झाली होती. परंतु वातावरणातील बदल. अतिवृष्टी तसेच अवकाळीचे सावट, वाढलेला उत्पादन खर्च अन्‌‍ गडगडलेले भाव यामुळे कांद्याच्या आगारातच बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरविल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कांदा पिकाकडे पाहिले जाते. तालुक्यातील शेतकऱ्यांची मदार कांदा पिकावरच अवलंबून असते. शेतकऱ्याचे वार्षिक गणितही कांदा पिकावरच आखले जात. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी कांदा पीक महत्वाचे ठरत होते. कांदा पिकावरच शेतकरी आपली सोनेरी स्वप्ने रंगवत असे. परंतु गेल्या काही दिवसांपासून कांद्याने अक्षरशः शेतकऱ्यांना रडवले आहे.

गावरान कांदा, लाल कांदा, रांगडा कांदा लागवडीमध्ये तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. कांद्याचे होणारे विक्रमी उत्पादन यामुळे अनेक राज्य, तसेच परराज्यातील व्यापारी तालुक्यात स्थायिक होऊन कांद्याचा व्यापार करीत आहेत. संपूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कांद्याची बांधावरील खरेदी नगर तालुक्यातूनच होत असते. तालुक्यातील कांदा राज्य, परराज्यात निर्यात केला जातो. गुणवत्ता व दर्जा चांगला असल्यामुळे येथील कांद्याला मोठी मागणी देखील असते. बंगलोर, छत्तीसगड, पश्चिम बंगाल तसेच इतर ठिकाणी बाजारपेठ मिळत असते.

सद्यस्थितीत बाजारामध्ये कांद्याची खूपच दयनीय अवस्था झाली आहे. भाव, गडगडलेले असून आहे त्या बाजारभावात कांदा विकणे शेतकऱ्याला कदापि परवडणारे नाही. अद्याप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गावरान कांदा वखारीमध्ये साठवून ठेवला होता. बाजार मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी ठेवलेला कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे. परंतु बाजारभाव काही वाढलेच नाही. त्यातच लाल कांदाही बाजारामध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्याची आशा ‌’धुसर‌’ झाली आहे. आजच्या बाजारभावात कांदा विकला, तर झालेला खर्च देखील वसूल होत नाही, अशी वास्तविकता आहे.

कांदा पिकाची झालेली विदारक परिस्थिती पाहता तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदालागवडीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे. कांदा पिकाऐवजी गहू, ज्वारी, हरभरा व इतर चारा पिकांकडे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे कांद्याच्या उत्पादनात तालुक्यात मोठी घट होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वातावरणात होणारा अचानक बदल, ढगाळ हवामान, पडणारे दव यामुळे कांदा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोगांच्या विळख्यातून पीक वाचविण्यासाठी महागडी औषधांची फवारणी व खतांचा वापर यामुळे उत्पादनासाठी मोठा खर्च येतो. परंतु उत्पन्नाची शाश्वत हमी नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकाकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येते.

उभ्या कांद्याच्या पिकात नांगर!

तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांद्याची बाजारातील परिस्थिती पाहून उभ्या पिकात नांगर घातल्याचे विदारक चित्र तालुक्यात पहावयास मिळाले. बियाणे, रोप, कांदा लागवड, शेतीची मशागत, महागड्या औषधांची फवारणी, खते, खुरपणी, काढणी, यासाठी मोठा खर्च येतो. परंतु उत्पन्नाची शाश्वती नसल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या उभ्या पिकात नांगर घातला आहे.

एक एकर कांद्याची लागवड केली होती. बियाणे व रोपाची निगा राखतानाच मोठा खर्च आला. नंतर मशागत, लागवड व औषधांची फवारणी साठी सुमारे 70 हजार रुपये खर्च झाला. देखील कांदा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत होता. त्यातच बाजार भाव गडगडलेले असल्यामुळे पीक तोट्यात जाणार होते. वैतागून उभ्या कांदा पिकात नांगर घालून चारा पिकाची पेरणी केली आहे.
हेमंत शेटे, शेतकरी, जेऊर

परराज्यात विक्रमी उत्पादन!

मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांनी कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले. त्यामुळे मागणी घटली. महाराष्ट्र राज्यात देखील इतर जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करण्यात आली आहे. त्यातच अद्याप शेतकऱ्यांनी गावरान कांदा वखारीमध्ये साठवून ठेवलेला आहे. त्यामुळे कांद्याच्या बाजारभावात वाढ होण्याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे पाठ फिरवून इतर पिकांची रब्बी हंगामासाठी निवड केलेली दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT