

नगर : विस्तार अधिकारी पदी पदोन्नती प्रक्रियेमध्ये शिक्षेची अंमल सुरू असल्याची बाब हेतुपुरस्सर दडवून गैरवर्तन केल्याप्रकरणी देवळाली प्रवराच्या केंद्र प्रमुख निलिमा गणपत गायकवाड यांच्यावर पुढील वेतनवाढ कायमस्वरुपी थोपविण्याची शिक्षा सीईओ आनंद भंडारी यांनी बजावली आहे. तसे आदेश काढले आहेत.
गायकवाड यांनी देवळाली प्रवरा केंद्रात कार्यरत असताना शालेय विद्यार्थ्यांना वर्ग खोली स्थलांतरीत करताना साहित्य व ओझे उचलण्यास आदेशित केल्याप्रकरणी पर्यवेक्षकीय कामकाजामध्ये कसूर केल्याने दि. 20 मार्च 2025 रोजी शिक्षा अंतिम केलेली ज्ञात असतानाही ही बाब प्रशासनापासून दडवून ठेवली व समुपदेशन प्रक्रियेमध्ये पंचायत समिती संगमनेर अधिनस्त घारगाव बीटमध्ये पदस्थापना निवडली.
त्यावर त्यांची पदोन्नती रद्द करून 5 ऑगस्ट 2025 रोजी कारणे दाखवा नोटीसीव्दारे खुलासा मागितला. त्यावर गायकवाड यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी दिलेला खुलासा समाधानकारक नसल्याने तो अमान्य करण्यात आला आहे. दि. 7 ऑक्टोबर 2025 अन्वये पुढील वेतनवाढ कायमस्वरुपी थोपविण्याची शास्ती का करण्यात येवू नये, याबाबत अंतिम कारणे दाखवा नोटीस देण्यात आली.
सात दिवसात हा खुलासा सादर करण्याची गरज असतानाही गायकवाड यांनी तो सादर केलेला नाही. त्यानुसार आपले काहीही म्हणणे नाही, असे समजण्यात येवून, निलीमा गणपत गायकवाड यांची पुढील वेतनवाढ कायमस्वरुपी थोपविण्याची शास्ती अंतिम करण्यात येत असून, मूळ सेवा पुस्तकात याची तात्काळ नोंद घेण्याबाबत कार्यवाही करावी, असेही सीईओंनी आदेशात म्हटले आहे.
उंबरे येथील शाळा खोल्यांच्या निर्लेखन प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून, त्याची तक्रार देवळाली प्रवराचे सामाजिक कार्यकर्ते जालिंदर आल्हाट यांनी केली होती. या अनुषंगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठीही शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना तसे आदेश काढल्याचे समजले.