

राहुरी : राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानासाठी 38 केंद्रावर 6 सेक्टर अधिकाऱ्यांसह 200 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाचे तीन फिरते पथक व 150 पोलिसांचा ताफा शहरात तैनात दिसणार आहे.
राहुरी नगरपरिषदेमध्ये यंदा भाजपने संपूर्ण ताकद लावली आहे. स्व. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खा. सुजय विखे व युवा नेते अक्षय कर्डिले यांनी भाजपकडून स्थानिक कार्यकर्त्यांची जोरदार मोर्चेबांधणी केली. तर विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे जागृत झालेल्या तनपुरे गटाने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे व डॉ. उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनामध्ये शहरात घर ना घर पिंजून काढले आहे. यांसह शिंदे सेना व वंचितनेही उमेदवार देत निवडणुकीत रंगत वाढवली आहे.
परंतु तनपुरे गटामध्ये अंतर्गत गटबाजी होऊन काही प्रभागात बंडखोर उभे आहेत. त्यामुळे तनपुरे गटाला विरोधकांसह स्वकीयांचाही सामना करावा लागणार आहे. कॉर्नर सभा तसेच सांगता सभेच्या माध्यमातून राजकीय नेत्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांची चिखलफेक केली. झालेली विकास कामे आमचीच व न झालेली कामे तुमचीच, असे सांगत सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी शहरात विकास कामांच्या वाताहतीबाबत हात झटकल्याचे दिसले. त्यामुळे राहुरीत राजकीय धुरळा चांगलाच तापला असून त्याचा निकाल दि. 3 डिसेंबरची मतमोजणी ठरवणार आहे.
राहुरी नगपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुपसिंह यादव, सहाय्यक नामदेव पाटील, अभिजित हराळ यांच्या माध्यमातून 38 केंद्रावर मतदार प्रक्रिया आज मंगळवारी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रक्रियेमध्ये प्रभाग 2 अ या जागेबाबत न्यायालयिन प्रक्रिया सुरू असल्याने तेथील जागेबाबत मतदान प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. उर्वरीत 23 नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी पुरुष मतदार 16 हजार 589 तर महिला मतदार 16 हजार 681 असे एकूण 32 हजार 270 मतदार राहुरीचा नगराध्यक्ष ठरविणार आहे. प्रशासनाकडून मतदान केंद्रावर मतदारांना प्राथमिक आरोग्य सेवा, पिण्याची पाण्याची सुविधा तसेच वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना रॅम्प सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच मतदारांना मतदान करण्यासाठी मदतीसाठी ई सुविधा दिली जाणार आहे.
राहुरी शहराच्या उज्वल भविष्यासाठी मतदारांनी ठरवून दिलेल्या वेळेतच आपले मतदान करून लोकशाहीला बळकट करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी यादव यांनी केले आहे.
मतदान केंद्र : 38
सेक्टर अधिकारी : 06
कर्मचारी नियुक्त : 200
फिरत्या पोलिस पथक : 03
पोलिस कर्मचारी : 150
राहुरी निवडणूक प्रशासनाकडून पालिका हद्दीतील मतदारांना आपले मतदार यादीतील नाव व प्रभाग शोधणे सोयीस्कर ठरावे म्हणून स्कॅनर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तो स्कॅनर मोबाईलमध्ये वापरल्यानंतर मतदारांना मतदानाचे केंद्र व प्रभाग यादी क्रमांक तत्काळ समजणार आहे.
राहुरी नगरपरिषदेमध्ये प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा ठोकत आहे. मतदार प्रत्येकाला आपलेच म्हणत असल्याने धक्कादायक निकाल लागणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून स्व. रामदास धुमाळ पाटील, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरी नगरपरिषद निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे राहुरी नगरपरिषदेचा निकाल पोटनिवडणुकीचे भवितव्य ठरविणार असल्याचे बोलले जात आहे. राहुरी नगरपरिषदेच्या निकालाकडे जिल्ह्याचे नव्हे तर राज्यातील नेत्यांचे लक्ष लागलेले आहे.