

अकोले : शहरात सुमारे 37 कोटी 85 लाख रूपये निधी मंजूर असलेल्या 100 बेडचे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन, उपजिल्हा रुग्णालय कार्यान्वित व्हावे, अशी अकोलेकरांची अपेक्षा आहे.
तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र 11 तर 72 उपकेंद्रे असून सुमारे अडीच लाख जनतेची आरोग्यसेवा या केंद्रावर अवलंबून असणार आहे. आदिवासी भागातील मोलमजुरी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबियांना मजुरी बुडवून शहरात उपचार घेणे परवडत नसल्याने हे आरोग्य केंद्र सोयीचे ठरणार आहे.
परंतु अकोले तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवेचा लाभ बहुतांश रुग्णांना मिळत नाही. तालुक्यात राजूर, समशेरपूर, कोतूळ, अकोले या चार ग्रामीण रुग्णालये आहेत. अकोल्यात फक्त 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय होते. त्यात 10 कर्मचारी, रुग्णवाहिका, दोन डॉक्टर आहेत. ही रुग्णसेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेर जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. यातून वेळ जातोच, शिवाय खर्चही मोठा होतो. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय असावे, अशी अकोलेकरांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. ती आता पूर्णत्वास जाताना दिसत आहे.
दरम्यान, नव्या इमारतीत महात्मा फुले योजना अंतर्गत सोईसुविधा आणि 100 बेडची व्यवस्था, यांसह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे, उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर अकोले तालुक्यातील आरोग्याची समस्या सुटणार आहे. तसेच सध्याची इमारत पाडून नव्याने इमारत उभारली जात आहे. ही दोन मजली इमारत असेल, 7326.48 चौरस मिटरचे बांधकाम होणार आहे.
उपजिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी, भुलतज्ञ, एमडी मेडिसिन, एक सर्जन, एक स्त्रीरोगतज्ञ, 15 मेडिकल ऑफिसर, कर्मचारी, स्केक बाईट कक्ष, सर्जरी विभाग, नोंदणी कक्ष, अपघात विभाग, सोनोग्राफी, फिजिओथेअरपी, लॅबोरेटरी, पोलिस चौकी, बालरुग्णालय विभाग, एक्स-रे विभाग,ईसीजी विभाग, दंतविभाग शल्यचिकित्सक, बाह्यरुग्ण विभाग, महिला व पुरुष प्रसाधन गृहे, शस्त्रक्रिया विभाग, सर्वसाधारण कक्ष, महिला व पुरुष प्रसाधन गृहे, ऑपरेशन थिएटर, लेबर रुम, नर्सेस रुम, डॉक्टर रुम, आय सी यु कक्ष, रेन वॉटर हार्वेस्टीग, पाणी पुरवठा, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्नीशमन यंत्रणा, सी.सी.टी.व्ही,संरक्षक भिंत आदि सोईसुविधा होणार आहे.