

नगर तालुका : नगर तालुक्यात दररोज बिबट्याकडून पशुधनाच्या शिकारीच्या घटना घडतच आहेत. बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
रविवारी (दि.30) पहाटे उदरमल येथे बिबट्याकडून गाय व वासरावर हल्ला करण्यात आला आहे. तर शेळीचा फडशा पाडण्यात आला असल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून, पिंजरा बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.
उदरमल हे गाव पाथर्डी व नगर तालुक्याच्या सीमेवर येत आहे. दोन्ही तालुक्यांतील वनक्षेत्र गावालगत असल्याने या परिसरात वन्यप्राण्यांचा मुक्त संचार आढळतो. डोंगर रांगांमध्ये यापूर्वी देखील बिबट्यांचा वावर अनेक वेळेस आढळून आला आहे. उदरमल परिसरात वारंवार बिबट्याने दर्शन दिले आहे. उदरमल, खोसपुरी, कोल्हार घाट, आगडगाव, डोंगरवाडी, बहिरवाडी या परिसरात गर्भगिरीच्या मोठ्या प्रमाणात डोंगररांगा आहेत. त्यामुळे हा परिसर वन्यप्राण्यांना आकर्षित करत असतो.
रविवारी पहाटे व उदरमल येथील दरा वस्तीवर लक्ष्मण त्रिंबक पालवे यांच्या गोठ्यातील पशुधनावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये गोठ्यातील गाय व वासरावर हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. शेळीला तुरीच्या शेतात फरपटत नेल्याची माहिती संबंधित शेतकऱ्याने दिली. घटनास्थळी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. त्यामध्ये गाय व वासरू जखमी झाल्याचे निदर्शनास आले. परंतु बिबट्याने नेलेल्या शेळीच्या मृतदेहाचा मागमुस देखील लागला नाही.
तालुक्यात दररोज शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या शिकारीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. तसेच बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासही शेतकरी तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. संपूर्ण तालुका बिबट्याच्या दहशतीखाली आला असून विद्यार्थी, लहान बालके, नागरिक, शेतकरी भयभीत झालेले आहेत.
उदरमल परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला असून सदर ठिकाणी पिंजरा बसविण्याची मागणी शाळा समिती सदस्य अगणदेव पालवे, नितीन पालवे, रवींद्र पालवे, गणेश पालवे, अनिल जायभाय, प्रशांत पालवे, ज्ञानदेव पालवे, अरविंद पालवे, अर्जुन पालवे, अभिषेक आव्हाड यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गावोगावी बिबट्यांचा वावर आढळून आल्यानंतर नागरिकांकडून पिंजरा बसविण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात येते. वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आल्यानंतर पिंजऱ्यात बिबट्या अडकण्यासाठी भक्ष म्हणून कुत्रे, शेळी, वासरू ठेवावे लागत असते. परंतु अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांकडून सहकार्य होत नसल्याने पिंजऱ्यामध्ये भक्ष ठेवण्याची मोठी समस्या वनविभागासमोर येत असल्याची माहिती समजली.
बिबट्यांच्या दहशतीमुळे संपूर्ण तालुका दहशतीखाली आहे. तालुक्यात चिमूरडीचा बळी तर आठ वर्षीय बालकावर जीवघेणा हल्ला झालेला आहे. दररोज पशुधनांच्या शिकारी होतच आहेत. शेतकरी, लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिला सर्वच बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. बिबट्याच्या नियंत्रणासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्यास विदारक चित्र निर्माण होईल असे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.