

संदीप रोडे
नगर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर चार नगरपालिकांच्या निवडणुका स्थगित झाल्या असल्या तरी आठ नगरपालिकांसाठी आज - मंगळवारी (दि.2) मतदान होत आहे. या आठही ठिकाणी महायुतीतच सत्तासंघर्ष सुरू असल्याचे दिसून आले. प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदान घडवून आणण्याची कसरत महायुतीच्या तिन्ही पक्षांना करावी लागणार आहे.
संगमनेरात तांबे आणि खताळ हे दोन विद्यमान आमदार सत्तेसाठी एकमेकांना भिडले. श्रीरामपुरात काँग्रेस विरोधात भाजपचा टशन रंगात येतेवेळीच शिवसेनेनेही सवतासुभा मांडत रंगत वाढविली. भाजपांतर्गत वादावर अखेरपर्यंत तोडगा न निघाल्याने आ. मोनिका राजळे विरोधात अरुण मुंडे असा सामना रंगला आहे. जामखेडच्या वर्चस्वासाठी आ. रोहित पवार आणि सभापती प्रा. राम शिंदे पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. श्रीगोंद्यात चौरंगी लढत होत असली तरी खरा सत्तासंघर्ष भाजपचे आ. विक्रमसिंह पाचपुते विरोधात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यातच रंगल्याचे दिसून आले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे संगमनेरवर एकहाती वर्चस्व राहिलेले आहे. त्यांच्या वर्चस्वाला शिवसेनेचे आ. अमोल खताळ हे सुरूंग लावण्यासाठी सरसावले आहेत. मात्र घरातच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने त्यांनाही घराणेशाहीच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली. माजी मंत्री थोरात यांनी संगमनेरची सगळी सूत्रे आ. सत्यजित तांबे यांच्या हाती देत त्यांच्यामागे पाठबळ उभे केले आहे. आ. तांबे यांनी ‘संगमनेर सेवा समिती’ची धूर्त चाल खेळत विकासाच्या मुद्द्यांवर मतदारांना साद घातली आहे. थोरात-तांबेंना शह देण्यासाठी आ.खताळ यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विखे कुटुंबाने धावाधाव केली. आता संगमनेर कोणाचे हे बुधवारी समोर येणार आहे.
श्रीरामपुरावर वर्चस्वासाठी काँग्रेसने कंबर कसली असून माजी आमदार दिवंगत जयंत ससाणे आणि माजी नगराध्यक्ष राजश्री ससाणे यांचे चिरंजीव जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ससाणे यांच्यासमोर भाजपचे श्रीनिवास बिहाणी यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रवेश करत बिहाणी यांनी उमेदवारी मिळविलीच; पण सोबतीला राष्ट्रवादीला घेत सत्तेच्या वाटेने मार्गक्रमण करत आहेत. मंत्री विखे पाटील यांच्या पाठबळावर बिहाणी यांचे भवितव्य अवलंबून आहे. भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश करत प्रकाश चित्ते यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविली. काँग्रेस-भाजपच्या सत्तासंघर्षात चित्ते यांच्या उमेदवारीने निवडणुकीत रंग भरला आहे. चित्ते यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेतल्याने श्रीरामपुरातील सत्तासंघर्ष पराकोटीला पोहचल्याचे दिसून आले.
शेवगावच्या सत्तेवरून भाजपांतर्गत वाद उफाळून आला. प्रदेश कार्यकारिणीचे सरचिटणीस अरुण मुंडे हे भाजपकडून पत्नीलाच नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते; मात्र आ. मोनिका राजळे यांनी भाजप तालुकाध्यक्ष महेश फलके यांच्या पत्नी रत्नमाला यांना ही उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज मुंडे यांनी शिवसेनेचे ‘धनुष्य’ उचलत आ. राजळे यांच्याशी सत्तेचा युद्धारंभ केला. राष्ट्रवादीकडून विद्या अरुण लांडे यांची उमेदवारी असली तरी चर्चेत मात्र फलके-मुंडेच राहिले. मुंडे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा घेत पाठबळ दिल्याने शेवगावात भाजपांतर्गत राजळे-मुंडे यांचा ‘सामना’ रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे.
जामखेडमध्ये पुन्हा एकदा आ. पवार व आ. शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष रंगला आहे. आ. रोहित पवार एकटेच राष्ट्रवादीची खिंड लढवत आहेत. आ. शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत पवारांना घेरण्याची रणनीती आखली. त्यामुळे जामखेडच्या लढतीने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
श्रीगोंद्यात नेहमीप्रमाणे पाचपुते विरोधात सगळे असे चित्र समोर आले, मात्र पाचपुते विरोधकांची एकी होण्याऐवजी बेकी झाली. ती कोणाच्या पथ्यावर पडते? हे बुधवारीच समोर येणार आहे. पाचपुते घराण्यातील दुसऱ्या पिढीचे आ. विक्रमसिंह पाचपुते हे नगरपालिकेत आस्ते कदम नीतीने पुढचे पाऊल टाकत राहिले. पाचपुते विरोधक मात्र जागा वाटपाचा तह हरले अन् स्वबळावर आले. शिवसेनेचा ‘धनुष्य’ उचलत माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी आ. पाचपुते यांच्यासमोर आवाहन उभे केले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने स्वतंत्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिले असले तरी खरी रंगत आ. पाचपुते विरोधात पोटे अशीच असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
शिर्डी आणि राहाता नगरपालिकेवर सत्तेसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिर्डीत भाजपच्या जुन्यांनी वेगळी भूमिका घेतल्याने निवडणुकीत रंग भरले. राहात्यात विखे विरोधक राहाता विकास आघाडीखाली एकवटले आहेत. मतदारसंघातील दोन नगरपंचायतीवर सत्ता राखण्यासाठी मंत्री विखे पाटील यांना प्रयत्नांची पराकष्टा करावी लागत आहे.
आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी नगरपालिकेवरील सत्तेसाठी भाजपला कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. मंत्री विखे पाटील यांनी राहुरीत भाजपला पाठबळ दिले असले तरी त्यांच्यासमोर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विखे-कर्डिले विरोधकांची मोट बांधत आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असले तरी आ. कर्डिले यांच्या निधनानंतर भविष्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीची किनार नगरपालिकेतील सत्तेला असणार आहे. त्यामुळेच ‘राहुरी’ कोणाची? हे सांगणाऱ्या बुधवारच्या निकालाकडे राज्याचेही लक्ष लागून असणार आहे.
आठ नगरपालिकांवरील सत्तासंघर्षाचा राजकीय पट पाहता खरी लढत महायुतीच्याच मित्रपक्षात होत असल्याचे दिसते. सर्वाधिक नगराध्यक्ष पदाच्या जागा जिंकून नंबर वनसाठी महायुतीतच ‘रेस’ असल्याचे प्रचारादरम्यान दिसून आले. आता नंबर वन कोण? हे बुधवारी उघडल्या जाणाऱ्या मतदान यंत्रातून समोर येणार असले तरी ते भवितव्य आज मंगळवारी मतदान यंत्रात बंद होणार आहे. नंबर वनसाठी मतदान घडवून आणण्यात जो बाजी मारेल, तोच सत्ताधीश होणार असल्याने आज सोमवारी चुरस पाहावयास मिळणार हे मात्र नक्की.