गोरक्ष शेजूळ
अहिल्यानगर : जिल्हा परिषदेच्या 75 गटांच्या सोडतीत माजी सभापती उमेश परहर, शरद नवले, अजय फटांगरे, जालिंदर वाकचौरे, संदेश कार्ले, शरद झोडगे यासह अनेक दिग्गजांच्या गटावर आरक्षण पडल्याने तर, कैलास वाकचौरे, सुनील गडाख, प्रताप शेळके या नेत्यांचे गट महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांची राजकीय कोंडी झाल्याचे दिसले. दरम्यान, महिलेसाठी राखीव झालेल्या गटात आता काही दिग्गजांनी आपल्या सौभाग्यवतींसाठी जुळवाजुळव सुरू केल्याचे दिसते आहे.(Latest Ahilyanagar News)
समाजकल्याणचे माजी सभापती उमेश परहर यांचा कुळधरण हा गट नागरीकांचा मागास प्रवर्ग खुला झाला आहे. कृषीचे माजी सभापती शरद नवले यांचा बेलापूर गट आरक्षित झाला. सुनील गडाख यांना सोनई सोयीचा होता, मात्र तो आरक्षित झाला आहे. त्यामुळे पुन्हा खरवंडीची त्यांना निवड करावी लागणार आहे. मात्र त्या ठिकाणीही महिलेसाठी जागा आहे. माजी अध्यक्षा राजश्री घुले यांचा दहिगावणे गट सर्वसाधारण झाला आहे. या ठिकाणी पुन्हा राजश्री घुले की क्षितीज घुले, याविषयी चर्चा आहेत.
कैलास वाकचौरे यांचा धामणगाव आवारी हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला आहे. जालिंदर वाकचौरे यांच्या गटावर आरक्षण पडल्याने त्यांची कोंडी झाली आहे. दरेवाडी राखीव झाला आहे, त्यामुळे संदेश कार्ले यांना अन्य सुरक्षित गट शोधावा लागणार आहे किंवा पंचायत समिती गणातही त्यांची उमेदवारी दिसू शकते. नागरदेवळे गटावरही आरक्षण पडले, त्यामुळे शरद झोडगे यांची कोंडी झाली. बारागाव नांदूर गटात आरक्षणामुळे धनराज गाडे यांना थांबावे लागणार आहे. त्यांना वांबोरी गटाचा पर्याय असल्याचे सांगितले जाते. वांबोरी गटात पुन्हा महिलेचे आरक्षण पडल्याने यावेळीही ॲड. सुभाष पाटील यांना कुटुंबातील महिला उमेदवार द्यावा लागणार आहे.
शालिनीताई विखे पाटील यांच्या लोणी खुर्द हा गट ओबीसी राखीव झाला आहे. मात्र या ठिकाणी त्यांची उमेदवारी शक्य आहे. राजेश परजणे यांचा संवत्सर सर्वसाधारण असल्याने त्यांना संधी आहे. मीराताई शेटे यांचा साकूर गट सर्वसाधारण झाला आहे, मात्र त्यांनाही या ठिकाणी संधी असल्याचे बोलले जाते. अनुराधा नागवडे, हर्षदा काकडे, राणी लंके यांचेही गट सोयीचे झाल्याचे दिसले.
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कर्डिले यांची नागरदेवेळी किंवा जेऊर गटातून राजकीय श्रीगणेशा होणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोन्ही गट आरक्षित झाल्याने आता ते ‘वाळकी’ गटातून लढणार का, याकडे लक्ष आहे. तर डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांच्या राजकीय एन्ट्रीकडे लक्ष असून, जोर्वे किंवा समनापूर गटातून त्यांची उमेदवारी होऊ शकते. दहिगावनेतून क्षितीज घुले, भालगावमधून ऋषिकेश ढाकणे, भानसहिवरा-भेंड्यातून उदयन गडाख या नावांचीही चर्चा आहे. लोणी खुर्दमधून धनश्रीताई सुजय विखे पाटील यांचीही उमेदवारी शक्य असल्याचे बोलले जाते.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर सर्वांच्या नजरा गटांच्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. कालच्या आरक्षण सोडतीनंतर अकोले, संगमनेरसोबत राहुरीलाही अध्यक्षपदाची तितकीच संधी मिळू शकते. दरम्यान, जर-तरची समीकरण जुळल्यास कॉ. अरुण कडू, बाबासाहेब भिटे यांच्यानंतर तिसऱ्यांदा राहुरीला अध्यक्षपदाचा बहुमान मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर ‘सर्वसाधारण’ इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यामुळे किमान आपले ‘गट’ तरी शाबूत राहावे, यासाठी अनेकांची धाकधूक सुरू होती. अखेर काल आरक्षण सोडत झाली, यात अनेकांचा हिरमोड झाला, तर काहींना अनपेक्षित लॉटरी लागली. मात्र, अध्यक्षपदाची संधी ही अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असल्याने ही संधी नेमकी अकोले, संगमनेर की राहुरीला मिळणार, याविषयी आडाखे बांधले जात आहेत.
अनुसूचित जमातीसाठी सात जागा राखीव निघाल्या. यामध्ये चार जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. संगमनेर तालुक्यातील बोटा, अकोले तालुक्यातील देवठाण व सातेवाडी आणि राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर हे चार गट महिलांसाठी राखीव झाल्याने तेथून निवडून येणाऱ्या उमेदवारच अध्यक्षपदाच्या दावेदार होणार आहेत.
संगमनेरचा बोटा गट काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी या गटात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व दिसले आहे. त्यामुळे या गटात विजयासाठी महायुतीला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. अकोले तालुक्यातील सातेवाडी हा गट आमदार किरण लहामटे यांना मानणारा असल्याचे कार्यकर्ते सांगतात; मात्र या ठिकाणी ते आपल्या कार्यकर्त्याला संधी देतात की आमदारकीसोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही आपल्याच घरात ठेवण्यासाठी ‘सौभाग्यवती’चे नाव पुढे करतात, याकडे लक्ष असणार आहे. राजूर गटात अनुसूचित जमातीचे आरक्षण आहे. मात्र त्या ठिकाणी महिलाही उमेदवारी करू शकतात.
त्यामुळे या ठिकाणी सुनीता भांगरे यांच्यासोबत वैभव पिचड यांच्या सौभाग्यवतींच्या नावाचीही चर्चा आहे. त्यामुळेच कदाचित, या ठिकाणी ‘भांगरे विरुद्ध पिचड’ अशी हायव्होल्टेज लढत पाहायला मिळू शकते. देवठाण गटात महिला आरक्षण असल्याने त्या ठिकाणी काहींची चाचपणी आहे. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर हा गट तनपुरेंप्रमाणेच विखेंचाही तितकाच दबदबा असणारा गट आहे. त्यामुळे या ठिकाणी अंकुश बर्डे, प्रदीप पवार या कार्यकर्त्यांच्या सौभाग्यवतींना संधी दिली जाऊ शकते.
एकूणच, राजकीय दृष्टिकोनातून पाहिले तर, महायुतीची सत्ता आल्यास संगमनेर, अकोलेच्या तुलनेत राहुरी तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर संगमनेर, अकोलेला ही संधी मिळेल, हे स्पष्ट दिसत आहे.
अशोक भांगरे यांना 1999 मध्ये अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर भांगरे घराण्यासाठी 2025 मध्ये पुन्हा ही संधी दृष्टिक्षेपात आहे. अर्थात त्या कोणत्या पक्षातून ही निवडणूक लढविणार आणि सत्ता कोणाची येणार, यावरही बरेच काही अवलंबून असणार आहे. सौ. लहामटेंनाही संधी आहे, मात्र महायुतीतील सुप्त संघर्षामुळे त्यांची अध्यक्षपदापर्यंतची वाटचाल कठीण आहे. राहुरीतून 1997 मध्ये अरुण पुंजाजी कडू हे अध्यक्ष झाले होते. 2007 मध्ये बाबासाहेब भिटे यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली होती. आता महायुतीची सत्ता आल्यास येथे बर्डे, पवार, साबळे यांना संधी समजली जात आहे.