

नगर तालुका: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अद्यापपर्यंत जेऊर- गुंजाळे रस्त्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे. शेकडो वर्षांची असलेल्या वहिवाटेवर खड्डे अन् चिखलाचे साम्राज्य पहावयास मिळते. शेतकरी, विद्यार्थ्यांचे रस्त्याअभावी अतोनात हाल होत असून, चापेवाडी ते गुंजाळे रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात आली आहे. (Latest Ahilyanagar News)
जेऊर येथून राहुरी तालुक्याला जोडणाऱ्या गुंजाळे वहिवाटेची पूर्वीपासून दुरवस्था झाली आहे. स्वातंत्र्यापूर्वी जेऊरमधून गुंजाळे वाट ही बैलगाडीची वाट प्रवासासाठी मुख्य रस्ता होता. परंतु अद्यापपर्यंत या रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. चापेवाडीपर्यंत डांबरीकरण झाले असले, तरी चापेवाडी ते गुंजाळे वाट हा रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची गरज आहे.
परिसरात लोकवस्ती मोठी असून, शेतीचे क्षेत्रही मोठे आहे. चापेवाडी, तसेच इमामपूर येथील शेतकऱ्यांचे मोठे क्षेत्र या परिसरात येते. शेतीची मशागत, तसेच शेतीमाल बाजारात आणण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. चापेवाडीच्या डोंगररांगांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीचे क्षेत्र आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून उद्योग करण्याची अनेक शेतकऱ्यांची मानसिकता आहे. परंतु रस्त्याअभावी काही करता येत नसल्याचे शेतकरी सांगतात.
वस्तीवरून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी चापेवाडी, तसेच जेऊर, अहिल्यानगरला चिखल तुडवत प्रवास करत आहेत. दुग्ध व्यावसायिकांचेही हाल होत असून, चापेवाडी ते गुंजाळे रस्त्याचे काम करण्याची मागणी शेतकरी वर्गामधून करण्यात येत आहे. चापेवाडी ते पवार वस्तीदरम्यान स्थानिक नागरिकांनी स्वखर्चातून मरून टाकून तात्पुरता रस्ता बनवला आहे. परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाकडून या रस्त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
चापेवाडी ते शिणखोरादरम्यान रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी दादासाहेब काळे, संजय काळे, गोरक्षनाथ तोडमल, दादासाहेब पवार, अमित शेटे, वसंत पवार, स्वप्नील तवले, भाऊसाहेब पवार, सोपान पवार, रोहिदास पवार, बाळू मोकाटे, विशाल पवार, दादा पाटोळे, छोटू पाटोळे, रवींद्र पवार यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
तर होऊ शकते पर्यटन स्थळ!
चापेवाडीच्या डोंगररांगांमध्ये निसर्गरम्य वातावरण पाहावयास मिळते. स्वच्छंदपणे बागडणारे वन्यप्राणी, विविध जातींचे पक्षी, कोसळणारे धबधबे अन् डोंगर- दऱ्यांमधून खळाळणारे पाणी असे अद्भुत दृश्य या परिसरात आहे. शिनखोरा, वाटेखोरी, धुरकुंड, बैलकुंड, बाराबाजाचा कुंड, कुरण अशी विविध निसर्ग रम्य ठिकाणे आहेत. रस्ता झाला तर हा परिसर निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकते, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
रस्त्याअभावी शेती करणे अवघड झाले आहे. शेतमाल बाजारात पाठविण्यास मोठी अडचण येते. परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चिखलातून प्रवास करावा लागतो. शेतकऱ्यांना शेतीचे क्षेत्र विकसित करता येत नाही. त्यामुळे चापेवाडी ते शिणखोरादरम्यान रस्ता होणे खूप गरजेचे आहे.
नाना काळे, शेतकरी