

शिरसगाव : जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या हरीगाव मळ्यावरील 339 रोजंदारी कामगारांना न्यायालयाच्या आदेशानुसार 2008 ते 2012 या सालातील 5 लाख 47 हजार 268 रुपयांचा बोनस मिळाल्याने कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.(Latest Ahilyanagar News)
शेती महामंडळाने पीक योजना बंद केल्यानंतर कामगारांचे पगार बंद झाले. त्यानंतर कामगार संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून रोजंदारी कामगारांना पगार देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 2008-2009 ते 2011-12 या काळातील होता.
त्या निर्णयाप्रमाणे कामगारांना शेती महामंडळाने पगार दिले होते. त्याच्यावरचा बोनस दिला नाही, म्हणून कामगार संघटनेने अहिल्यानगर औद्योगीक न्यायालयात बोनस मिळावा म्हणून केस दाखल केली. त्याचा निकाल कामगार संघटनांचे बाजूने लागला व 8.33 टक्के प्रमाणे बोनस देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर महामंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
उच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून याचिका कामगारांना 8.33 टक्के बोनस चार वर्षाचा देण्याचा आदेश दोन महिन्यापूर्वी दिला. कामगार नेते अविनाश आपटे, सुभाष कुलकर्णी यांना सदर याचिकेत पक्षकार करण्यात आले होते. महिन्यापूर्वी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापुढे बैठक झाली असता कामगार संघटनेने उच्च न्यायालयाचा निर्णय लागूनही बोनस पेमेंट मिळत नसल्याचे निदर्शनास आणले. त्यांनी न्यायालय निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आदेश व्यवस्थापकीय संचालक पुणे यांना दिले. त्याप्रमाणे आता बोनस पेमेंट वाटप सुरू झाले आहे. या निर्णयाने कामगारांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.