

सोनई: शनिशिंगणापूरबाबत संभाजीनगर खंडपीठाने 10 नोव्हेंबरपर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिल्याने नवीन समिती व जुने विश्वस्त मंडळ दोघांकडूनही कारभार चालू आहे. आता दैनंदिन कारभारासाठी आवश्यक गोष्टी कमी पडल्यास, भाविकांची गैरसोय झाल्यास जबाबदार कोण राहणार? त्यात न्यायालयाच्या आदेशाशिवाय सील उघडणे अशक्य असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार व बोनसवर साडेसाती आल्याचे चित्र आहे. (Latest Ahilyanagar News)
नवीन समिती व जुने विश्वस्त मंडळ मंदिरात येऊन काम करत आहे. त्यात कर्मचाऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. आम्ही सांगतो तसा कारभार केला नाही, तर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा, अशी सक्त तंबी कर्मचाऱ्यांना दोन्ही बाजूंकडून देण्यात येत आहे. कुणाचा आदेश पाळायचा या विवंचनेत विभागप्रमुख, तसेच कर्मचारी आहेत.
भाविकांच्या दैनंदिन सुविधेसाठी दैनंदिन बर्फी प्रसाद, मूर्तीवर अर्पण करण्यासाठी तेल, साफसफाईच्या वस्तू अशा अनेक गोष्टींची आवश्यकता असते. तसेच जर भाविकांची गैरसोय झाली, तर कोण जबाबदारी घेणार? जुने विश्वस्त मंडळ व कार्यकारी समिती यापैकी कुणाला जबाबदार धरणार? विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अध्यक्षांनी देवस्थानचे ज्या ज्या बँकेत खाते आहे तेथे पत्र दिले की खंडपीठाने जैसे थे परिस्थिती ठेवली आहे. न्यायालयाचा निर्णय झाला त्या वेळेस बँकेत आमच्याच सह्यांचे अधिकार असल्याने दुसरे खाते उघडू देऊ नये, असे पत्र अध्यक्षांनी बँकेला दिले आहे.
देवस्थानच्या इतिहासात पहिल्यांदा अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही बाजूंकडून आपल्याच बाजूने निर्णय झाला असे सांगण्यात येत आहे. शनिभक्तांची रस्त्यावर अडवणूक होती, भाविकांना लटकूंकडून त्रास होत आहे अशा विविध अडचणी भाविकांसमोर आहे. त्यांना येथे काय घडते याचे काही घेणे-देणे नाही. त्यांना सुविधा व सुरक्षा पाहिजे आहे.
न्यायालयाचा अवमान व सील
खंडपीठाने 10 नोव्हेंबरला पुढची सुनावणी ठेवली आहे. प्रशासकीय कार्यालय सील असल्याने व न्यायालयाचा अवमान होऊ नये, म्हणून दोन्ही बाजूंकडून सील उघडणे जोखमीचे असल्याने जुने विश्वस्त मंडळ किंवा नवीन समिती सील उघडेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीअगोदर होणे अडचणीचे दिसत आहे.