भाईंदर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईवर उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू असे कृपाशंकर सिंह म्हणाले. ते मीरा-भाईंदर येथे बोलत होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर मनसे आक्रमक झाली असून महाराष्ट्रापासून मुंबई तोडायचा घाट असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर भारतीय समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने रणनीती आखली आहे. त्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारच्या आमदार मैथिली ठाकूर यांना मुंबई आणि आसपासच्या महापालिकेत प्रचारात उतरवण्यात येणार आहे. त्याशिवाय भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाकडून महापालिका क्षेत्रात उत्तर भारतीय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. त्यात मीरा-भाईंदर येथे भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर भारतीयांचा महापौर बसवूया असं आवाहन जनतेला करण्यात आले. या मेळाव्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी माध्यमांशी संवाद साधला.
कृपाशंकर म्हणाले की, बिहार निवडणुकीनंतर ही 9 वी सार्वजनिक निवडणूक आहे. लवकर महापालिका निवडणुका व्हाव्यात अशी जनतेची इच्छा होती. मीरा भाईंदर महापालिकेसह 29 महापालिकेत भाजपाच्या नेतृत्वात महायुतीची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याशिवाय आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू ज्यातून उत्तर भारतीय महापौर बसेल असा दावा त्यांनी केला. तसेच नकली शिवसेना गेली, असली आमच्यासोबत आहे. हिंदुत्व आणि विकास आमचा मुद्दा आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व महाराष्ट्रात मजबूत आहे. उत्तर प्रदेशात बाबा का बुलडोजर चालतो तसा फडणवीस यांच्या विकासाचा बुलडोजर महाराष्ट्रात सुरू आहे. जे कुणी समोर असतील त्यांना उद्ध्वस्त करून भाजपाच्या नेतृत्वात 29 महापालिकेत आमची महायुतीची सत्ता येईल असंही कृपाशंकर सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, मीरा भाईंदर शहराचा विकास भाजपाने कसा केलाय हे उत्तर भारतीयांना सांगण्याची गरज होती. त्यासाठी आजचे संमेलन होते. आम्ही प्रत्येक समाजाच्या बैठकीचे आयोजन केले आहे. मीरा भाईंदरमध्ये राहणाऱ्या वेगवेगळ्या समाजाचे आम्ही मेळावे घेत आहोत. आमची भूमिका त्यांच्यासमोर ठेवत आहोत. या मीरा भाईंदर शहरात बहुतांश महापौर हे उत्तर भारतीय राहिले आहेत असं आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले.
यासंदर्भात मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपलं मत नोंदवलं आहे. युतीची सत्ता येईन. मराठी उमेदवार जास्त निवडून येतील. मराठीच महापौर असेन. सिंह काय बोलले हे माहीत नाही, असे सरनाईक म्हणालेत.
मीरा भाईंदरमध्ये एवढे उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणा की उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मिरा-भाईंदरमध्ये केले होते. यावर सामंत यांनी महापौर ठरविण्याचे अधिकार कृपाशंकर सिंह यांना नाहीत, असे सांगितले. भाजपमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंग यांना दिले असतील असे मला वाटत नाही. मुंबईचा किंवा कोणत्याही पालिकेचा महापौर कोण असावा, याचे धोरण कृपाशंकर सिंग ठरवू शकत नाहीत. त्याचा निर्णय महायुतीतील सर्व प्रमुख नेते चर्चा करूनच घेतील, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर बसवणार या कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याचा मनसेचा समाचार घेतला आहे. तुम्ही चड्डी बनियनवर आलेले... आता महापौर बनण्याच्या भाषा करताय, हलवा आहे का..? असा इशारा मनसेचे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले, असं बोलताना लाज वाटत नाही का..? मुंबई आणि मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच होणार आणि तो ही राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शाखाली होणार. तुम्ही सभागृहाच्या आतमध्ये असाल, पण बाहेर रस्त्यावर आम्ही असू. धुमाकूळ घालू. या मुंबईची तुमच्यावर फार मोठी मेहेरबानी आहे. त्यामुळे मुंबईबद्दल बोलताना दहा वेळा विचार करा. त्यामुळे आगीत तेल ओतण्याचे काम करू नका. त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा इशारा मनसेचे मीरा भाईंदर शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी दिला आहे.
भाजपाची पहिली यादी आली त्यात वीस ते पंचवीस परप्रांतीय होते. यांना परप्रांतीय नगरसेवकांचा टक्का वाढवायचा आहे. नगरसेवक जास्त आले की हे महापौर पदासाठी दावा करणार. मुंबईचा महापौर तर मराठीत होणार. समजा परप्रांतीय महापौर नाही झाला तर राजकारणातून बाहेर होणार का तुम्ही? भाजपा त्यांच्या नेत्यांच्या तोंडातून बोलायला लावत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते मुंबईत राहून मराठी माणसाचा अपमान करत आहेत, असं मत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी नोंदवलं आहे.
उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो, उद्या गुजराती जाईल तर गुजराती म्हणेल. आता त्यांना मतं घेण्यासाठी अशा पद्धतीने भाषणे करावी लागतात. त्यांना अशी स्टेटमेंट करावी लागतात. मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही भाषावाद सहन करत नाही, कोणीही झालं तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो. कृपाशंकर म्हणत असतील तर तो त्यांचा पक्षाचा दावा आहे, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या विषयावर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन आहेर यांनी, त्यांना मराठी महापौर होईल सांगावे लागलं. हिंदी भाषिक नेत्यांचा माज आहे का? हिंदी भाषिक महापौर होईल असे आवाहनात्मक बोलण्याची हिंम्मत कशी होते. यांचा माज जनता उतरवेल, असं म्हटले आहे.