

मुंबई : मुंबईत 2025 या वर्षात गेल्या 14 वर्षांतील मालमत्ता विक्रीचा सर्वाधिक उच्चांक गाठला गेला. या वर्षात 1 लाख 50 हजार 254 मालमत्तांची विक्री झाली. यातून 13 हजार 487 कोटी रुपये महसूल जमा झाला.
वर्षाच्या अखेरीस बाजारातील तेजी कायम राहिली. डिसेंबर 2025 मध्ये 14 हजार 447 मालमत्तांची नोंदणी झाली, ज्यामुळे राज्याच्या तिजोरीत 1,263 कोटी रुपयांचे योगदान मिळाले. यामुळे नोंदणींमध्ये वार्षिक 16 टक्के वाढ झाली आणि मुद्रांक शुल्क संकलनात 11 टक्के वाढ झाली. अनुक्रमे, डिसेंबरमध्ये नोंदणींमध्ये 18 टक्के वाढ झाली, तर मुद्रांक शुल्क महसूलात 22 टक्के वाढ झाली. विशेष म्हणजे, डिसेंबर हा वर्षातील दुसरा सर्वाधिक विक्रीचा महिना होता. डिसेंबरमध्ये एकूण नोंदणींमध्ये निवासी मालमत्तांचा वाटा 80 टक्के होता. नाईट फ्रँक इंडियाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.
मुंबईत नोंदणीची गती सातत्याने उच्च किंमतीच्या मालमत्तांकडे सरकत आहे. डिसेंबर 2025 मध्ये एकूण नोंदणींमध्ये 5 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या घरांचा वाटा 7 टक्के होता, जो गेल्या वर्षी 6 टक्के होता. 1 कोटीपेक्षा कमी किंमतीच्या मालत्तांचा वाटा कमी झाला. 2 ते 5 कोटींच्या मालमत्तांचा वाटा स्थिर राहिला. 1 ते 2 कोटींच्या दरम्यानच्या मालमत्तांचा वाटा 2024 मध्ये 30 टक्क्यांवरून 2025मध्ये 32 टक्क्यांपर्यंत वाढला.
डिसेंबर 2025मध्ये पश्चिम आणि मध्य उपनगरांचा एकूण नोंदणीमध्ये 86 टक्के वाटा होता. पश्चिम उपनगरांनी 57 टक्क्यांसह आघाडी घेतली तर मध्य उपनगरांनी 29 टक्के वाटा उचलला. याउलट, दक्षिण मुंबईचा वाटा 7 टक्क्यांवर स्थिर राहिला, तर मध्य मुंबईचा वाटा 7 टक्क्यांपर्यंत घसरला.