

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सोडलेल्या 62 पैकी 46 वॉर्डांमध्येच वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केल्यामुळे काँग्रेसवर आता 16 जागांवर अपक्षांना पाठिंबा देण्याची नामुष्की आली आहे. वंचितच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या मतपेढीला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतदारांमधील प्रभाव तसेच वंचित बहुजन आघाडीचा आग्रह विचारात घेऊन काँग्रेसने मुंबईत या पक्षाला 62 जागा सोडल्या होत्या. मात्र, मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितने 16 जागांवर उमेदवार मैदानात उतरविले नाहीत. आपल्याकडे उमेदवार नाहीत याची कल्पनाही वंचितने काँग्रेसला दिली नाही.
काँग्रेसला वेळीच माहिती मिळाली असती, तर त्यांनी त्या जागांवर आपले उमेदवार उभे केले असते. मात्र, मुदत संपल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यामुळे काँग्रेसला आता तेथे एबी फॉर्म देता येणे शक्य झाले नाही. वंचितच्या या अनपेक्षित धक्क्यामुळे काँग्रेसच्या गोटात संताप व्यक्त होत आहे.
आमच्याबद्दल खोडसाळ प्रचार
वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, आम्ही 16 वॉर्डांमध्ये उमेदवार उतरवीत नसल्याचे काँग्रेसला मंगळवारी सकाळीच कळविले होते. आमच्यात चांगला समन्वय आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाकडून आमच्याबाबत खोडसाळ प्रचार केला जात आहे. आमची आघाडी झाल्यामुळे त्यांना पोटदुखी झाली आहे. आमच्यात अंतर निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे. आमच्या आघाडीमध्ये मिठाचा खडा कसा पडेल याचा प्रयत्न काहीजण सातत्याने करत आहेत. पण त्यांना त्यात यश येणार नाही. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्तम समन्वय साधून काम करत आहेत.
वंचित बहुजन आघडीने 62 जागा मागून 46 जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे 16 जागांवर ना वंचितचा उमेदवार आहे, ना काँग्रेसचा. याचा राजकारणात चुकीचा संदेश गेल्याची खंत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. उमेदवार नसताना इतक्या जागा का मागितल्या, असा सवालही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.