

मुंबई : वैविध्यपूर्ण विषय, अनोखी मांडणी, अप्रतिम सादरीकरण, उत्तम कलाकार-तंत्रज्ञ अशी भट्टी जमून आल्यामुळे यावर्षी मराठी रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’,‘रणरागिणी ताराराणी’, ‘करून गेलो गाव’, ‘पाहिले न मी तुला’ अशी दर्जेदार नाटकं बघायला मिळाली.
येत्या काही दिवसांत ‘एकदा पहावं करून’, ‘शंकर जयकिशन’, ‘लग्नपंचमी’ अशी अनेक चांगली नाटकं रंगभूमीवर येणार असल्यामुळे नव्या वर्षातही नाटकांचा शो मस्ट गो ऑन सुरूच असल्याचे पाहायला मिळणार आहे.
अन्न, वस्त्र, निवारा यानंतर आता मनोरंजन समाजमनाची चौथी महत्त्वाची गरज बनू लागली. रंगभूमीवर नवीन नाटकांसोबत जुनी नाटके नव्या रूपात आल्यामुळे मराठी प्रेक्षकवर्ग पुन्हा नाट्यगृहाकडे वळू लागला. नव्या वर्षात काही नवी आणि काही पुनरुज्जीवित नाटकं बहार उडवून देणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या नाटकांच्या जोडीला तीन नव्या नाटकांचे शुभारंभ डिसेंबर महिन्यात होत आहेत. त्यात हमखास यशस्वी जोड्यांसोबतच काही नवी समीकरणं पाहायला मिळणार आहेत.
ओटीटीमुळे प्रेक्षकांच्या बदलत चाललेल्या अभिरुचीपुढे मराठी नाटके पुन्हा तग धरतील का अशी स्थिती असतानाच अनेक नाटकांमुळे मराठी रंगभूमी पुन्हा चर्चेत आली. रंगभूमीवर यश मिळवलेल्या ‘चारचौघी’, ‘वस्त्रहरण’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘सही रे सही’ या नाटकांच्या प्रयोगांनी प्रेक्षक कायम राखला. नव्या संचासह रंगभूमीवर आलेल्या ‘हिमालयाची सावली’, ‘पुरुष’, ‘सखाराम बाईंडर’ ‘कुणी तरी आहे तिथं’ अशा नाटकांनाही प्रेक्षकांनी दाद दिली.
मागील वर्षी अनेक चांगली नाटकं, विशेषतः जुनी नाटकं रंगभूमीवर आली. यामधील काही नाटकांच्या तिकीटबारीवर अनेकदा हाऊसफुलचे बोर्ड लागले. मराठी रसिक प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे वळू लागला आहे हे खूप आशादायी चित्र आहे. नवीन वर्षात देखील चांगला आशय, दिग्गज कलावंत असणारी नाटकं येत असल्यामुळे मराठी रंगभूमीची नाटकाची यशस्वी परंपरा निरंतर अशीच चालू राहणार आहे, याचा विश्वास वाटतो.
प्रशांत दामले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद