Candidate Pudhari
मुंबई

Municipal Election Candidate: महापालिकांच्या उमेदवारी अर्जसंख्येत 8.6 टक्के घट

29 महापालिकांत 67 बिनविरोध; उमेदवार कमी झाल्याने लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात 29 महानगरपालिकांच्या रणधुमाळीत तब्बल 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यात सर्वाधिक 66 बिनविरोध सत्ताधाऱ्यांचे असल्याने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले असतानाच या निवडणुकीत उमेदवारी अर्जांची संख्याही 8.6 टक्क्यांनी घटल्याचे चित्र समोर आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पक्षांच्या अधिकृत उमेदवारीसाठी राज्यभर प्रचंड चुरस, रेटारेटी आणि अगदी रडारडही दिसली. प्रत्यक्षात मात्र गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा कमी उमेदवार रिंगणात उतरले. गेल्या निवडणुकीत जिथे 17 हजार 432 उमेदवार रिंगणात हेोते तिथे 15 हजार 931 उमेदवार उभे असल्याचे 29 महानगरपालिकांच्या अंतिम आकडेवारीवरून दिसते. ही घट 8.6 टक्के आहे. याचा अर्थ निवडणूक लढवण्यात असलेला रस घटला.

महापालिकांच्या प्रभागातील लढती या खासकरून बहुरंगी आणि चुरशीच्या असतात. असे असताना अनेक महापालिकांच्या मैदानात उमेदवारांची घट दुअंकी आहे. धाक , दडपशाही करून उमेदवारांना उभेच राहू दिले नाही किंवा अर्ज मागे घेण्यास लावले, असे आरोप विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उमेदवार संख्येत झालेली ही घट अभ्यासाचा विषय ठरते.

सर्वांत मोठी घट मुंबईत आहे. गेल्या वेळी ज्या मुंबईत 227 जागांसाठी 2275 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्याच मुंबईत यावेळी 1700 उमेदवारी अर्ज माघारीनंतर उरले. ही घट 25 टक्के आहे. नवी मुंबईतही उमेदवार संख्येत 26.5 टक्के घट झाली. कल्याण-डोंबिवलीत ही घट 34.8 टक्के, ठाण्यात 18.5 टक्के, तर पनवेलमध्ये सर्वाधिक 39 टक्के उमेदवार घटले. 2000 साली 22 महापालिका होत्या. त्या 29 झाल्या. आतापर्यंतच्या चार निवडणुकांमध्ये उमेदवार संख्या 14930 वरून 17451 वर गेली. मग 17432 झाली आणि यंदा ही संख्या 15931 वर आली.

कुठे, किती घटले उमेदवार?

पनवेल 39%

कोल्हापूर 35.80%

कल्याण-डोंबिवली 34.80%

नवी मुंबई 26.50%

मुंबई 25.30%

मालेगाव 19.50%

अकोला 19%

ठाणे 18.50%

अहिल्यानगर 16.50%

सांगली-मिरज-कुपवाड 15.50%

नांदेड-वाघाळा 15.10%

मिरा-भाईंदर 14.50%

नागपूर 12.50%

लातूर 11.80%

नाशिक 10.50%

पिंपरी-चिंचवड 10.50%

धुळे 9.90%

उल्हासनगर 9.80%

सोलापूर 9.50%

छत्रपती संभाजीनगर 7.90%

भिवंडी-निजामपूर 4.60%

चंद्रपूर 2%

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT