

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्तारूढ पक्षांनी लोकशाही गुंडाळून टाकली असून पैशाचा खेळ सुरू आहे. मतदानाआधीच घोडेबाजार सुरू असून बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत. लोकशाहीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ‘नोटा’चा पर्यायही आहे, बिनविरोधच्या ठिकाणी मतदारांना ‘नोटा’ वापरण्याची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
निवडणुका या काही नवीन नाहीत, निकोप लोकशाहीत विरोधी पक्षांनाही तेवढेच महत्त्व आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात सहा बिगर काँग्रेसचे मंत्री होते, ही आपली संस्कृती व परंपरा आहे . पण विरोधकच नको, अशी प्रवृत्ती भाजपा व महायुतीची बनली असून त्यातून बिनविरोधसाठी सत्ताधारी कोणत्याही स्तराला जात आहेत. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला अर्ज भरू न देणे, धमक्या देणे, पोलीस व प्रशासन यांच्या मदतीने खेळ सुरू आहे. निवडणूक आयोग मात्र याचा मूक साक्षीदार बनला आहे, याचा आम्ही निषेध करतो, असे सपकाळ म्हणाले.
संवैधानिक पदावरील व्यक्तीने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणे अपेक्षित आहे. लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, राज्यपाल, विधानसभेचे अध्यक्ष, परिषदेचा सभापती ही संवैधानिक पदे आहेत, त्यांचा आदराने उल्लेख केला जातो, पण महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. राष्ट्रपती यांनी याची गंभीर दखल घेऊन नार्वेकर यांना पदावरून बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली.