

मुंबई : महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे 67 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समीर गांधी यांनी यासंदर्भात थेट हायकोर्टाचे दार ठोठावत ॲड. असिम सरोदे यांच्यामार्फत रिट याचिका दाखल केल्या आहेत. बिनविरोध निवड जाहीर केलेल्या प्रभागांतील अर्ज मागे घेण्याच्या संशयास्पद प्रक्रियेची स्वतंत्रपणे चौकशी करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला द्या, अशी विनंती याचिकेतून केली आहे.
राज्याच्या अनेक महापालिकांच्या क्षेत्रात उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी बेकायदेशीर कृत्यांचा अवलंब करण्यात आला आहे. राजकीय दबाव, धमकी आणि पैशांचे वाटप करून विरोधी उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले आहे, असा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत सत्ताधारी पक्षाचे मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून आणल्याच्या मुद्द्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी संशयास्पदरित्या उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तेथील परिस्थितीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, त्या चौकशीवर उच्च न्यायालयाची देखरेख असावी, बिनविरोध निवडीसाठी विशिष्ट मतसंख्या निश्चित करीत सरकारने कायद्यात आवश्यक ती सुधारणा करावी, तसेच कथित बिनविरोध निवडणूक घोळाची स्वतंत्ररित्या सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित प्रभागांतील निवडणुकीच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी, अशा विविध मागण्या याचिकेतून करण्यात आल्या आहेत.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांमध्ये 67 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे सर्वाधिक भाजपच्या 15, तर शिवसेनेच्या 7 अशा 22 उमेदवारांचा समावेश आहे. जळगावमध्ये 12 जण बिनविरोध निवडून आले , त्यात भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 6-6 उमेदवारांचा समावेश आहे, तर भिवंडीत भाजपचे सहा,तर शिवसेनेचे दोन असे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तसेच ठाण्यात शिवसनेचे सात, पनवेलमध्ये भाजपचे सहा, तर अपक्ष एक असे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले. अहिल्यानगरमध्ये भाजपचे तीन, तर राष्ट्रवादीचे दोन असे पाच उमेदवार विजयी झाले, तर धुळ्यात भाजपचे चार उमेदवार विजयी झाले, तर पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे प्रत्येकी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. मालेगावमध्ये इस्लामिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला आहे.
ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीसह विविध महापालिकांमध्ये झालेल्या बिनविरोध निवडीवर आक्षेप घेत मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेत या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत निकाल जाहीर न करण्याची मागणी केली आहे. यावेळी जाधव यांनी काही पुरावे सादर केले. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव म्हणाले की, ठाण्यातील निवडणूक निर्णय अधिकारी मागील दोन-तीन दिवस भयंकर पध्दतीने वागले आहेत. पैशांच्या आमिषावर उमेदवार गायब करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जातानाचे व्हिडीओ आहेत. ते आम्ही निवडणूक आयुक्तांना दाखवले. काही वैयक्तिक माहितीही त्यांना दिली. ते पुढे म्हणाले की, आम्ही पालिका आयुक्तांना ही माहिती व पुरावे दिल्यावर आयुक्तांनी ठाण्याच्या निवडणूक आयुक्तांना फोन केला आणि त्वरित अहवाल मागवला आहे. त्यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. तर, आम्ही आयोगाला उदाहरणेही दिली आहेत. ठाणे प्रभाग क्रमांक पाचमध्ये विक्रम चव्हाण उमेदवार आहेत. ते तिथे उपस्थित नसताना त्यांचा अर्ज बाद करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे आम्ही निदर्शनास आणले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.