

मुंबई : मुंबईत ठाकरे बंधूंची आता एकच संयुक्त सभा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर 11 किंवा 12 जानेवारीला होणार असल्याची माहिती ‘उबाठा’ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, सभांऐवजी मुंबईतील सर्व शाखांना भेटी देऊन तेथील शिवसैनिकांशी संवाद साधण्यास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुरुवात केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी कांदिवली, मागाठाणे, बोरिवली, दहिसर येथील शिवसेना, तसेच मनसेच्या शाखांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुंबईतील शाखांच्या भेटीनंतर शेवटच्या टप्प्यात सभा पार पडणार आहेत. मुंबईसह ठाणे, नाशिक येथे मनसे आणि ठाकरे सेनेची युती असून, छत्रपती संभाजीनगर येथे ठाकरे सेना स्वतंत्र लढत आहे. त्यामुळे नाशिक व ठाणे येथे दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा होईल. उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर येथे सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर 11 किंवा 12 जानेवारी रोजी ‘शिवतीर्थ’ येथे उद्धव व राज यांची संयुक्त सभा होऊन प्रचाराचा समारोप केला जाणार आहे.