

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेना (शिंदे गट) विरुद्ध सेना (ठाकरे बंधू) हे 87 जागांवर परस्परांसमोर उभे असून, येथे थेट रंगतदार लढती होणार आहेत. मुंबईतील मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या वॉर्डांत या लढती होतील.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर मुंबईत 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य आणि वायव्य मुंबई या तीन जागी शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात सामना झाला होता. यात शिंदेंनी 1, तर ठाकरेंनी 2 जागा जिंकल्या होत्या.
महानगरीतील वायव्य मुंबई शिंदे गटाने, तर उर्वरित दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य या दोन जागा उद्धव ठाकरे गटाने जिंकल्या होत्या. यावेळी मनसेने भाजपप्रणीत महायुतीला पाठिंबा दिला होता.
विधानसभा निवडणुकीत दादर, माहिम, भायखळा यासह मराठीबहुल क्षेत्रात दहा जागांवर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यात सामना झाला होता. त्यातील 7 जागा ठाकरे गटाने जिंकल्या होत्या; पण आता समीकरणे आणखी बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत राज ठाकरे यांच्या मनसेची युती झाली आहे. त्यामुळे मराठी मतांचे विभाजन ठाकरे बंधू एकत्र असल्याने होणार नाही, असे दोघांना वाटते.
मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी सेना (शिंदे गट) विरुद्ध उद्धव ठाकरे गट हे 69 जागांवर परस्परांसमोर उभे आहेत, तर शिंदे गट विरुद्ध मनसे 18 जागांवर परस्परांसमोर उभे आहेत. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकलेले तत्कालीन शिवसेनेचे 50 हून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. त्यातील काही माजी नगरसेवकांना शिंदे गटाने तिकीट दिले आहे; पण मराठी मतांसोबत भाजपची मते हस्तांतरित झाली तर त्यांना विजयाची संधी आहे. मराठीबहुल भागात ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे मराठीबहुल जागा निवडून आणणे शिंदे यांच्यापुढे आव्हान आहे.
भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात 97 जागांवर सामना आहे, तर मनसे 35 जागांवर भाजपच्या विरुद्ध लढत आहे. ठाकरे बंधूंना शिंदे गटाविरोधातील जागांवरील लढतीत विजयाची शक्यता जास्त आहे. गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय मतांचे प्राबल्य असलेल्या जागांवर ठाकरे बंधूंची कसोटी लागेल.