

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत अनेक बंडखोरांना थंड करण्यात सर्वच पक्षांना यश आले असले तरी, अजूनही 50 पेक्षा जास्त प्रभागांमध्ये बंडखोरी कायम आहे. या सर्व बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असली तरी, पक्षाच्या उमेदवारासाठी त्यांचे आव्हान कायम आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे भाजपासह शिवसेना ( उबाठा), शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 130 पेक्षा जास्त प्रभागांत बंडखोरी झाली होती. यात सर्वाधिक 60 प्रभागांत बंडखोरी ठाकरेंच्या शिवसेनेत झाली असून काहीनी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर काहीजण पक्षाच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले. यापैकी 29 जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून यात शिवसेना नेते अनिल परब यांचे खंदे समर्थक चंद्रशेखर वायंगणकर, कमलाकर नाईक, परशुराम छोटू देसाई, नयना देहरकर या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात वायंगणकर व देसाई माजी नगरसेवक आहेत.
भाजपा व शिवसेना शिंदे गटात सुमारे 45 ठिकाणी बंडखोरी झाली होती. यापैकी 9 ते 10 प्रभागांमध्ये बंडखोरी कायम आहे. काँग्रेसमध्येही 20 प्रभागांत बंडखोरी झाली होती. यापैकी दहा जणांची समजूत काढण्यात काँग्रेसला यश आले. राष्ट्रवादी व अन्य पक्षांतही बंडखोरी झाली होती. मात्र यातील 80ना समजावण्यात आले. तरीही मुंबई महापालिका निवडणुकीत 50 पेक्षा जास्त प्रभागांत बंडखोरी आहे. यात पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या ठाकरेंच्या 29 बंडखोरांचा समावेश आहे.
ठाकरे गट प्रमुख बंडखोर
प्रभाग क्र. 74 संदीप मोरे, मंदार मोरे
प्रभाग क्र. 95 शेखर वायंगणकर
प्रभाग क्र. 169 कमलाकर नाईक
प्रभाग क्र. 183 रोहित खैरे, गणेश खाडे
प्रभाग क्र. 197 परशुराम (छोटू) देसाई
प्रभाग क्र. 202 विजय इंदुलकर
प्रभाग क्र. 208 मंगेश बनसोड
प्रभाग क्र. 218 नयना देहेरकर, आरती लोणकर
प्रभाग क्र. 8 अर्पिता कवळी
प्रभाग क्र. 26 सचिन केळकर
प्रभाग क्र. 59 अल्फा पेवेकर
प्रभाग क्र. 71 अनिता जनावळे
प्रभाग क्र. 177 नेहल शहा
प्रभाग क्र. 180 जानवी फाटक