

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. देशपांडे यांचे जिवलग मित्र संतोष धुरी यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि ही जोडी भाजपात जाणार असल्याचे संकेतच मिळाले.
सोमवारी मंत्री नितेश राणे आणि भाजपचे किरण शेलार यांच्या समवेत संतोष धुरी यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे धुरी यांचा भाजप प्रवेश मंगळवारीच होईल असे मानले जाते.
उद्धव-राज ठाकरे बंधूंच्या युतीनंतर दादरचा मनसेचा वॉर्ड क्रमांक 194 उद्धव गटाला गेला. तिथे धुरींना तिकीट मिळेल असे खात्रीने वाटत होते. मात्र राज ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि अनेकदा डुप्लिकेट राज ठाकरे म्हणून चर्चेत राहणारे यशवंत किल्लेदार यांच्यासाठी प्रभाग 192 घेत राज ठाकरेंनी धुरींचा हक्काचा प्रभाग 194 उद्धवगटाला देऊन टाकला. तेव्हापासून धुरी नाराज आहेत.
मनसेच्या प्रत्येक आंदोलनात आणि प्रसंगी तुरुंगातही एकत्रच राहिलेले संदीप देशपांडे व संतोष धुरी ही जोडी अतूट मानली जाते. त्यामुळे धुरी यांचा भाजप प्रवेश निश्चित होताच संदीप देशपांडे यांचेही नाव भाजप प्रवेशाच्या चर्चेत आले.
उद्धव व राज हे दोघे बंधू एकत्र आल्यापासून एरव्ही राज यांच्यासोबत सावलीसारखे उभे राहणारे संदीप देशपांडे थोडे दूर दूर राहू लागल्याचे दिसते. देशपांडे यांना ठाकरे बंधू एकत्र यावे असे वाटत होते. पण मनसेसाठी झटलेल्या कार्यकर्त्यांचा महानगरपालिका निवडणुकीत विचार व्हावा, अशी त्यांची भूमिका होती.
मनसेच्या आजवरच्या इतिहासात राज ठाकरे यांना अंधारात ठेवून परस्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीही भेटलेले नाही. पण हे धाडस संतोष धुरी यांनी दाखवले व धुरी भाजपात जाणार यावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जाते. धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची घेतलेली भेट म्हणजे मनसेमध्ये मोठा भूकंप होणार असल्याचे संकेत मानले जात आहेत. धुरी यांच्यासोबत स्वतः संदीप देशपांडेही भाजपात दाखल होतील असे खात्रीने सांगितले जाते.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव ठाकरेंच्या युतीमध्ये असताना मनसेचे दुसऱ्या फळीतले नेते संतोष धुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आणि मोठ्या प्रवेशाचे संकेत मिळाले. यावेळी मंत्री नितेश राणे व किरण शेलार उपस्थित होते.