Latest

देशांतर्गत विमान वाहतूक पूर्ण प्रवासी क्षमतेने करण्याची परवानगी

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महारोगराईचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्राकडून देशांतर्गत विमान वाहतूक प्रवासी क्षमतेवर मर्यादा घालण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने नागरी उड्डयण मंत्रालयाने 18 ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान वाहतूक पूर्ण प्रवासी क्षमतेने करण्याची परवानगी दिली आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक विमान 100 टक्के प्रवासी क्षमतेने उड्डाण घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पूर्ण प्रवासी क्षमतेची परवानगी देण्यात आली असली, तरी कोरोना प्रोटोकॉलचे काटेेकोर पालन करण्याचे निर्देशदेखील केंद्रीय नागरी उड्डयण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. नवीन आदेश येत्या सोमवारपासून कार्यान्वित केले जातील.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करून नियमांचे कटाक्षाने पालन करण्याचे दिशानिर्देश विमान कंपन्या तसेच विमानतळ संचालकांना देण्यात आले आहेत. विमान प्रवासाच्या वाढत्या मागणीचा आढावा घेतल्यानंतर क्षमतेवरील प्रतिबंध हटवण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मे 2020 पासून नागरी उड्डयण मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीमध्ये प्रवाशांच्या क्षमतेवर मर्यादा घातली होती. सद्यस्थितीत देशांतर्गत उड्डाण घेणार्‍या विमानातील प्रवासी क्षमता 85 टक्के आहे. 9 ऑक्टोबरला देशांतर्गत 2 हजार 340 विमान सेवा संचालित करण्यात आली. हे प्रमाण कोरोनापूर्व देशांतर्गत विमान वाहतूक क्षमतेचा 71.5 टक्के होते. कोरोना प्रसारामुळे केंद्र सरकारने दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मे 2020 मध्ये देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू केली होती.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT