कोरोना लसीकरण : सीरिंज तुटवडा, डोसमधील अंतराचा लसीकरणात अडथळा | पुढारी

कोरोना लसीकरण : सीरिंज तुटवडा, डोसमधील अंतराचा लसीकरणात अडथळा

कोल्हापूर; राजेंद्र जोशी : कोरोना लसीकरण अभियानात लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असली, तरी ती टोचण्यासाठी आवश्यक सीरिंज आणि नागरिकांच्या लसीच्या दोन डोसमधील अंतर सध्या मोठा अडथळा ठरते आहे. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने सीरिंजच्या निर्यातीवर मोठे निर्बंध आणले असून, महाराष्ट्र सरकारने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडे (आयसीएमआर) लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी साकडे घालण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महाराष्ट्रामध्ये सध्या लस सर्वत्र उपलब्ध आहे. राज्य सरकारने दररोज 15 लाख डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करून महाराष्ट्राला संपूर्ण लसीकरणाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी चंग बांधला आहे. तथापि, दोन डोसमधील अंतराच्या कारणाने सुमारे 71 लाख नागरिकांचा दुसरा डोस लटकला आहे. यासाठीच राज्य सरकारने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेला लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी विनंती प्रस्ताव तयार केला आहे. केंद्र शासनाने परदेशात जाणार्‍या प्रवाशांसाठी विशेषतः विद्यार्थीवर्गासाठी डोसमधील अंतर कमी करण्याचा प्रयोग यापूर्वी केला होता. या प्रयोगाचा आधार सध्या महाराष्ट्र शासन घेऊ पाहते आहे.

लसीच्या दोन डोसमधील अंतराप्रमाणे लस टोचण्यासाठी आवश्यक सीरिंजच्या तुटवड्याने लसीकरण प्रक्रियेवर मोठा परिणाम झाला आहे. देशात लसीचे प्रतिमहिना 20 कोटींहून अधिक डोस उपलब्ध होत आहेत. तथापि, त्यासाठी आवश्यक सीरिंजच्या उत्पादनात वाढ न झाल्याने सीरिंजसाठी लसीकरण प्रक्रियेचा वेग मंदावतो आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नुकतेच सीरिंजच्या निर्यातीवर निर्बंध आणण्याचे पाऊल उचलले आहे. प्रामुख्याने कोरोना लसीकरण प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणार्‍या 0.5 मि.लि. व 1 मि.लि. स्वयंनिकामी होणार्‍या (अ‍ॅटोडिसेबल), 0.5 मि.लि., 1 मि.लि., 2 मि.लि. व 3 मि.लि. डिस्पोजेबल व 1, 2 व 3 मि.लि. पुनर्वापरास प्रतिबंधकरणार्‍या सीरिंजचा समावेश आहे. या प्रवर्गातील सीरिंज मोठ्या संख्येने निर्यात करता येणार नाहीत, असा शासनाचा आदेश आहे. संबंधित निर्णय हा निर्यातीवरील निर्बंध स्वरूपाचा असून निर्यातबंदी नाही, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात 28 टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण

महाराष्ट्रात 18 वर्षे वयोगटापुढील लसीकरणपात्र नागरिकांची संख्या 9 कोटी 14 लाख इतकी आहे. यापैकी 2 कोटी 59 लाख म्हणजे 28 टक्के नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे, तर 6 कोटी म्हणजेच 65 टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त एन. रामस्वामी यांच्या माहितीनुसार, राज्यात सध्या केवळ दोन डोसमधील अंतरामुळे दुसर्‍या डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या 71 लाख आहे. यामध्ये 57 लाख ‘कोव्हिशिल्ड’धारक, तर 14 लाख ‘कोव्हॅक्सिन’धारक आहेत.

Back to top button