परग्रहावरील मानवाकडून अमेरिकेत अण्वस्त्रांशी छेडछाड | पुढारी

परग्रहावरील मानवाकडून अमेरिकेत अण्वस्त्रांशी छेडछाड

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : परग्रहावरील जीवांमुळे (एलियन) पृथ्वीवर तिसरे महायुद्ध होऊ शकते. एलियन्सना मी अमेरिकेतील अण्वस्त्रांशी छेडछाड करताना प्रत्यक्ष पाहिले आहे. हे दावे कुणा सोम्यागोम्याने केलेले नाहीत. अमेरिकन हवाई दलातून निवृत्त झालेल्या एका बड्या अधिकार्‍याने केलेले आहेत. या दाव्यांमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

अमेरिकन हवाई दलाचे चार माजी प्रमुख या दाव्यांची चौकशी करत असून लवकरच ते याबाबत मोठा खुलासा करणार असल्याने अवघ्या जगाचे लक्ष त्याकडे लागलेले आहे. एलियनबाबतचा दावा एकेकाळी अमेरिकन हवाई दलातील शस्त्रास्त्र नियंत्रण विभागाची जबाबदारी असलेले अधिकारी रॉबर्ट सॅलॅस यांनी केलेले आहेत.

टायटन 3 च्या अंतराळ मोहिमा

अमेरिकेच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र विभागात प्रसारण अधिकारी म्हणून रॉबर्ट हे एकेकाळी नावाजलेले होते. ‘मिसाईल टायटन 3’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांच्या विभागात ते अभियंताही होते. अमेरिकेच्या अनेक अंतराळ मोहिमांमध्येही त्यांनी मोलाची जबाबदारी पार पाडलेली आहे.

परग्रहावरील आलेल्या एलियन्सनी अमेरिकेच्या शस्त्रागारातील सर्व अण्वस्त्रांशी छेडछाड केली होती. किंबहुना ती चालवूनही पाहण्याचाही प्रयत्न केला होता. या सगळ्यात अमेरिकेची 10 इंटरकाँटिनेंटल (आंतरखंडीय) बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे निकामी झाली होती, असेही रॉबर्ट यांनी म्हटले आहे. घटना अर्थात जुनी म्हणजे 1967 मधील आहे.

अमेरिकेच्या माल्मस्ट्रॉम हवाई तळावर अंडरग्राऊंड लाँच कंट्रोलचे तेव्हा ते (रॉबर्ट) कमांडर होते. अगदी अलीकडेही अशाच एका घटनेची पुनरावृत्ती झालेली आहे. अमेरिकन हवाई दलाचे चार माजी प्रमुख करणार असलेल्या खुलाशात त्याचाही तपशील येईल, असा रॉबर्ट यांचा दावा आहे.

* अधिकार्‍याच्या दाव्याने खळबळ; महासत्तेच्या 4 माजी हवाई दलप्रमुखांकडून चौकशी
* एलियन्समुळे होऊ शकते तिसरे महायुद्ध
* एलियन्सनी 10 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे निकामी केली

Back to top button