Latest

कोल्हापूर मध्‍ये डेल्टा प्लसचा अ‍ॅक्टिव्ह रुग्ण नाही : प्रशासक डॉ. बलकवडे

अमृता चौगुले

कोल्हापूर शहरात सद्य:स्थितीत डेल्टा प्लसचा एकही अ‍ॅक्टिव्ह रुग्ण नाही, अशी माहिती महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोल्हापूर मधील सीपीआरच्या वतीने महिन्याला रँडमली कोरोनाचे सुमारे शंभर सॅम्पल जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठविले जातात. मेमध्ये पाठविलेल्या सॅम्पलचा अहवाल 8 ऑगस्टला रात्री आला. यात कोल्हापूर शहरातील एका महिलेचा रिपोर्ट डेल्टा प्लस व्हेरियंट असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित महिलेचे सॅम्पल 26 मे रोजी पाठविले होते. कोणतीही लक्षणे नसलेली रुग्ण महिला घरीच उपचार घेऊन ठणठणीत बरी झाली आहे.

शहरातील मोरे-माने नगरातील 62 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. संबंधित महिलेचे दोन्ही डोस एप्रिलमध्ये पूर्ण झाल्यानंतर मेमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

मेमध्ये तो परिसर कंटेन्मेंट झोन करण्यात आला. त्यांच्याशी संबंधित हाय रिस्कमधील 13 जणांची तपासणी केली असता 3 पॉझिटिव्ह आले होते. परंतु दोन डोस व प्रतिकारशक्ती चांगली असल्याने संबंधित महिला घरीच उपचार घेऊन दहा दिवसांत बरी झाली. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आवश्यक आहे, असेही डॉ. बलकवडे यांनी सांगितले.

कोल्हापूरचा समावेश तिसर्‍या टप्प्यात

आरटी-पीसीआर चाचणीतून कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट गेल्या आठवड्यात 3.81 टक्क्यांवर आला आहे, तरीही जिल्हा प्रशासनाने कोल्हापूरचा समावेश तिसर्‍या टप्प्यात करून अन्याय केल्याची प्रतिक्रिया व्यापारीवर्गातून व्यक्‍त होत आहे. शासन निकषांप्रमाणे सर्व व्यापारी दुकानांची वेळ सायंकाळी 7 पर्यंत करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

कोरोनाची लाट राज्यात ओसरत होती तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळत होते. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत निर्बंध लावताना चार टप्पे करण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूर शासन निर्बंधाच्या चौथ्या टप्प्यात होते. जिल्ह्यातील केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू होती. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत आल्यावर कोल्हापूरचा समावेश तिसर्‍या टप्प्यात करू, असे सांगण्यात आले; पण रेट दहाच्या आत आला तेव्हा शासनाने आरटी-पीसीआर चाचण्यांतून 10 टक्क्यांच्या आत प्रमाण आले पाहिजे, असे नवीन आदेश काढले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT