नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा : जगातील इतर देशांप्रमाणे भारतात देखील वेगाने कोरोना विरोधातील लसीकरण अभियान राबवले जात आहे. देशात ५० कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. पंरतु, देशांतर्गत लसीकरण अभियान राबवताना इतर गरजू देशांना कोविशील्ड तसेच कोवॅक्सिनचे डोस पुरवण्यात भारत आघाडीवर आहे.
मदत स्वरूपात तसेच व्यावसायिकतेतून भारताने आतापर्यंत जवळपास ६६३.७ लाख डोसची निर्यात केल्याची माहिती केंद्रीय परराष्ट्र मंत्र्याकडून लोकसभेत देण्यात आली. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांनी 'व्हॅक्सिन डिप्लोमसी'संबंधीचा प्रश्न लोकसभेत उपस्थित केला होता. यावर उत्तर देतांना सरकारकडून ही लिखित माहिती सादर करण्यात आली.
भारताने आतापर्यंत बांगलादेशला सर्वाधिक ३३ लाख डोस अनुदानित स्वरूपात दिले आहेत. बांगलादेशपाठोपाठ म्यानमार १७ लाख, नेपाळ ११ लाख, भूटान ५.५ लाख, मालदीव २ लाख तसेच मॉरिशसला १ लाख लशींचे डोस अनुदान स्वरूपात देण्यात आले आहे. व्यावसायिकतेच्या अनुषंगाने बांगलादेशला ७० लाख डोस पुरवण्यात आले आहे. म्यानमार २० लाख, नेपाळ १० लाख, मालदीव १ लाख तसेच मॉरिशसला ३ लाख डोसचा पुरवण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
श्रीलंका, ब्राझील, ओमान, मिस्त्र, अल्जीरिया, दक्षिण आफ्रिका, कुवेत, संयुक्त अरब अमीरात, अफगानिस्तान, अर्जेटीना, घाना, नायजेरिया, कंबोडिया, सीरिया तसेच इतर देशांना देखील भारताकडून लस पुरवठा करण्यात आला आहे. भारताकडून आतापर्यंत अनुदानित स्वरूपात १०७.१५ लाख डोस, तर व्यावसायिकतेतून ३५७.९२ लाख डोस पुरवण्यात आले आहेत. १६ एप्रिल २०२१ पर्यंत 'मेड इन इंडिया' कोव्हॅक्सिनचे १९८.६३ लाख डोस पुरवण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
कोवॅक्सिनची २.५६८ लाख डोसची शेवटची खेप सीरियाला रवाना करण्यात आली होती. देशातून करण्यात आलेली निर्यात ही देशांतर्गत लशींचे उत्पादन, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाची आवश्यकता आणि विदेशातून मेड इन इंडिया लसीच्या मागणीला लक्षात घेता करण्यात आल्याचे देखील केंद्राकडून सांगण्यात आले आहे. लशींची विदेशात निर्यात करतांना याचा देशांतर्गत लसीकरणावर प्रभाव पडणार नाही, याची काळजी देखील घेण्यात आली असून सध्या देशाचे संपूर्ण लक्ष लसीकरण अभियानावर असल्याचे सांगण्यात आले आहे.