कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर

कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर वाचनालयाचे साहित्य पुरस्कार जाहीर
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : रेंदाळ (जि. कोल्हापूर) येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२० सालासाठीचे विविध साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. कविता या प्रकारासाठीचा साहित्य पुरस्कार राजू देसले (नाशिक) यांच्या 'अवघेचि उच्चार' या कवितासंग्रहास जाहीर झाला.

‍कादंबरीसाठीचा पुरस्कार संतोष जगताप (लोणविरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्या 'विजेने चोरलेले दिवस' साठी देण्यात आला.

कथासंग्रहासाठीचा पुरस्कार सुचिता घोरपडे (कोल्हापूर) यांच्या 'खुरपं' साठी जाहीर करण्यात आला.

तर बालवाङ्मयासाठीचा पुरस्कार एकनाथ आव्हाड (मुंबई) यांच्या 'शब्दांची नवलाई' या बालकविता संग्रहासाठी जाहीर करण्यात आला.

रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी सुमारे १००हून अधिक लेखक- कवींनी आपली पुस्तके पाठविली होती.

विजय चोरमारे आणि आशुतोष पोतदार यांचा विशेष सन्मान

वाचनालयाच्या वतीने कोल्हापूर परिसरातील ज्येष्ठ आणि उल्लेखनीय अशा दोन लेखकांचा त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मान करण्यात येतो.

त्यासाठी यावर्षी ज्येष्ठ कवी,अनुवादक, पत्रकार विजय चोरमारे आणि नव्या पिढीतील आश्वासक नाटककार, कवी आशुतोष पोतदार या दोघांची निवड करण्यात आली आहे.

विजय चोरमारे हे दीर्घकाळापासून पत्रकार म्हणून कार्यरत असून, त्यांचे 'पापण्यांच्या प्रदेशात', 'शहर मातीच्या शोधात', आणि 'आतबाहेर सर्वत्र' हे तीन कवितासंग्रह प्रकाशित आहेत.

हिंदी कवी प्रियदर्शन यांच्या 'नष्ट कुछ भी नहीं होता' या कवितासंग्रहाचा त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.

याबरोबरच त्यांचे अनेक संशोधनपर आणि संपादित ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

त्यांच्या अनेक साहित्यकृतींना आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

पटना(बिहार) येथील 'नई धारा' नियतकालिकातर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित 'नई धारा रचना पुरस्कार' त्यांना प्राप्त झाला आहे.

डॉ. आशुतोष पोतदार हे इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांची 'आनंदभोग मॉल', 'पुलाखालचा बोंबल्या मारुती', 'F1/105', 'सिंधू, सुधाकर आणि इतर' ही नाटके प्रकाशित आहेत.

त्याबरोबरच जाँ जने या फ्रेंच नाटककाराच्या 'द मेड्स' या नाटकाचे 'कामवाल्या बाया' या नावाने मराठी रूपांतर केले आहे.

याशिवाय अलिकडेच त्यांचा 'खेळ खेळत राहतो उंबरा' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे.

पुरस्कार निवड समितीसाठी डॉ. रफीक सूरज, डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. गिरीश मोरे यांनी काम पाहिले.

पुरस्कार वितरण समारंभाची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असे वाचनालयाचे अध्यक्ष श्री. आर. एम. पाटील (सर) यांनी जाहीर केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news