इलेक्ट्रिक वाहने : गेल्या तीन वर्षात ५ लाखांहून अधिक नोंदणी | पुढारी

इलेक्ट्रिक वाहने : गेल्या तीन वर्षात ५ लाखांहून अधिक नोंदणी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात इंधन दराने शंभरी ओलांडली आहे. अशात इंधन दरवाढीसह महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोल-डिझेलचे दररोजचे वाढते दर लक्षात घेता देशवासियांनी इलेक्ट्रिक वाहने याकडे कल वळवला असल्याचे चित्र केंद्र सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारी वरून निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात तब्बल ५ लाख १७ हजार ३२२ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी करण्यात आल्याचे सरकारकडून लोकसभेत सांगण्यात आले आहे.

देशात इलेक्ट्रिक, हायब्रीड वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने ‘फेम इंडिया’ अर्थात ‘फास्टर ऍडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रीड ऍन्ड इलेक्ट्रिक व्हेईकल्स’ ही योजना २०१५ मध्ये सुरू केली होती.

योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची १ एप्रिल २०१९ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू आहे. यासाठी १०,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या टप्प्यात सार्वजनिक,शेअर पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या वाहतुकीच्या साधनांचे विद्युतीकरण आणि ७ हजार ९० ई-बसेस, ५ लाख ई- तिचाकी, ५५ हजार ई- चारचाकी प्रवासी वाहने आणि १० लाख ई- दुचाकी यांना अनुदानाचे पाठबळ देण्यावर भर दिला जात आहे.

 ई- दुचाकी, ई- तिचाकी आणि ई- चारचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या ३८ ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्सची (ओईएम) फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ९ ऑगस्ट २०२१ पर्यंत नोंदणी झाली आहे, हे विशेष.

रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षात नोंदणी झालेल्या या इलेक्ट्रिक वाहनांचा तपशीलासंबंधी एका लेखी उत्तरातून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री क्रिशन पाल गुर्जर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

गेल्या तीन वर्षात नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या

     वर्ष       नोंदणीकृत इलेक्ट्रिक वाहने

१)  २०१८         १,३१,५५४

२)  २०१९         १,६१,३१४

३) २०२०          १,१९,६४८

४) २०२१          १,०४,८०६

……………………….. ….. …. .

एकूण——      ५,१७,३२२

Back to top button