सातारा जिल्हा बँक निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. बँकेच्या जावली सोसायटी मतदार संघातील निवडणूक यावेळी कधी नव्हे एवढी लक्षवेधक ठरली असून आ. शशिकांत शिंदे यांच्यापुढे राष्ट्रवादीतूनच तगडे आव्हान उभे राहिले आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी शड्डू ठोकला असून 49 पैकी 35 मतदार आपल्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर बाजी पलटवण्यात तरबेज असलेल्या आ. शशिकांत शिंदे यांनीही बहुमताएवढे संख्याबळ आपल्याकडे असल्याचे सांगत निवडणूक जिंकण्यासाठी सर्व पद्धतीचे डाव टाकले आहेत. जावलीचे भूमिपुत्र असलेल्या माजी मंत्र्यांना त्यांच्या मायभूमीतच आव्हान दिले गेले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गाफील राहिलेल्या आ. शशिकांत शिंदे यांच्यासाठी पुढची लढाई अभिमन्यूसारखी असणार आहे. या लढाईत ते सर्व कारस्थानांना चितपट करणार का? पटावरचा मोहरा असलेले ज्ञानदेव रांजणे डार्क हॉर्स ठरणार का? याविषयी संपूर्ण राज्यात उत्सुकता आहे.
जिल्हा बँक निवडणुकीमुळे जावली तालुका जिल्ह्याच्या राजकीय पटलावर आला आहे. जावली सोसायटी मतदार संघावर शिंदेंनीच आजपर्यंत बाजी मारल्याचे दिसत आहे. अगोदर 'काका' व नंतर 'साहेब' यांचाच या मतदार संघावर कब्जा राहिला आहे. यापूर्वी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व काका गटाचे प्रणेते स्व. लालसिंगराव शिंदे, त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव स्व. राजेंद्र शिंदे यांनी केले होते. राजेंद्र शिंदे यांच्या पत्नी सुनेत्रा शिंदे यांचीही महिला प्रतिनिधी मतदार संघातून जिल्हा बँकेवर वर्णी लागली होती. त्यादरम्यानच आ. शशिकांत शिंदे यांनी काका गटाला शह देत या मतदार संघावर सलग दोन पंचवार्षिकला कब्जा मिळवला. ही पार्श्वभूमी असली तरी सध्याची परिस्थिती कमालीची बदलली आहे. यावेळी आ. शशिकांत शिंदे यांना तगडे आव्हान उभे राहिल असे वाटलेही नव्हते. ते गाफील राहिले. मात्र, ज्ञानदेव रांजणेंनी ही कमाल करुन दाखवली आहे. वास्तविक रांजणे यांचा एवढा मोठा आवाका आहे का? असा प्रश्नही आता तालुक्याच्या राजकीय पटलावर उपस्थित होवू लागला आहे. मात्र, पडद्यामागच्या हालचाली काहीही असल्या तरी आ. शिंदे यांची राजकीय दमछाक व्हावी एवढी परिस्थिती निर्माण झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
जावलीत या मतदार संघाचे एकूण मतदार 49 इतके आहे. त्यामुळे 25 मतदार विजयासाठी पुरेसे आहेत. ज्ञानदेव रांजणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. असे असले तरी ते केवळ तांत्रिक दृष्ट्याच राष्ट्रवादीत आहेत. प्रत्यक्षात आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जात आहे. रांजणे यांनी जिल्हा बँकेची तयारी खूप अगोदरपासूनच केल्याचे आता समोर येत आहे. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यासमवेत जिल्हा बँकेच्या अनुषंगाने मध्यंतरी झालेल्या बैठकीत ज्ञानदेव रांजणे यांनी आपल्याकडे 35 मतदार असल्याचा ठाम दावा केला होता. त्यावेळी ना. अजितदादांनी 'एवढे मतदार असतील तर तुम्ही निवडणूक लढवा', असे आपल्याला सांगितल्याचे रांजणे यांचे म्हणणे आहे. रांजणे यांनी हे मतदार सहलीवर नेल्याचेही त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यातच रांजणे यांना वसंतराव मानकुमरे यांची फूस असल्याने येथील निवडणूक कमालीची लक्षवेधक ठरली आहे.
आ. शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्तेही विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आपल्याकडे असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. प्रत्यक्ष मतदानातच आपली ताकद दाखवून देवू, अशी त्यांची भूमिका असल्याचे दिसत आहे. वास्तविक सलग तिसर्यांदा या मतदार संघातून आपण बँकेवर जावू, असा विश्वास आ. शिंदे यांना होता. मात्र, तसे घडले नाही. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत रांजणे माघार घेतील, अशी अटकळ त्यांचे कार्यकर्ते बांधून होते. प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. त्यामुळे सरतेशेवटी निवडणूक लागलीच. आता प्रत्यक्ष मैदानातच काय ती ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.
जावली सोसायटीतील मतदारांची संख्या 49 एवढी मर्यादित आहे. त्यामुळे विजयाचे आडाखे बांधणे फारसे कठीण नाही. ज्ञानदेव रांजणे यांच्याकडे विजयासाठी आवश्यक असणारी गोळाबेरीज नसती तर ते या फंदातच पडले नसते. त्यांना आवश्यक संख्याबळ मिळाल्यामुळेच ते निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उतरल्याचे सांगण्यात येत आहे. आ. शिंदे यांना मात्र येथे अति आत्मविश्वास नडल्याचे बोलले जात आहे. अशी परिस्थिती ओढावेल याची चुणूक जरी आ. शिंदे यांना अगोदर लागली असती तरी त्यांनी यापूर्वीच स्वत:ला सेफ करुन ठेवले असते.
मात्र, वेळ निघून गेल्यावर ते सावध झाले आणि तोपर्यंत रांजणे व मानकुमरे माणसे घेवून गेले. असे असले तरी बाजी पलटवण्यामध्ये आ. शशिकांत शिंदे तरबेज आहेत. दीपक पवार यांनी जरी माघार घेतली असली तरी त्यांच्याकडेही मतदार आहेत. हे मतदार नेमकी कुणाची बाजू घेतात हेही पाहणे औत्सुक्याचे आहे. रांजणे व मानकुमरे यांच्या ताब्यातील लोक काढून घेण्याचे कसब आ. शिंदे यांच्याकडे आहे. त्यांचा मूळचा पिंड त्यांनी दाखवला तर रांजणे व मानकुमरे यांच्यासाठी निवडणूक सोपी जाणार नाही. अर्थात शशिकांत शिंदे नेमक्या काय मुव्हमेंट करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
जिल्हा बँकेचे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी सत्ताधारी सहकार पॅनलची घोषणा केली. त्यामध्ये जावली सोसायटी मतदार संघातून शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर केले. एवढेच नव्हे तर यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी 'आ. शिवेंद्रराजेंच्या संमतीने आ. शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिल्याचे' सांगितले. त्यामुळे शिवेंद्रराजे हे शशिकांत शिंदेंना मदत करणार का? याची जावली तालुक्यात उत्सुकता आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे जावलीवर पूर्णत: वर्चस्व आहे. त्यांच्या अधिपत्याखाली विविध सहकारी संस्था, सोसायट्या आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ज्ञानदेव रांजणे हे आ. शिवेंद्रराजे यांचेच कट्टर समर्थक समजले जातात. सातारा – जावली विधानसभा मतदार संघात रांजणे यांचीही मते आहेत. आ. शिवेंद्रराजे भोसले व राजू भोसले यांच्यावर रांजणे यांची कमालीची निष्ठा आहे. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रांजणे यांना आ. शिवेंद्रराजेंनी अनेक फोन केले होते. मात्र त्यांचा मोबाईल स्विचऑफ होता. अशा परिस्थितीत रांजणे हे शिवेंद्रराजेंच्या हातात तरी राहिले आहेत का? की मानकुमरेंनी त्यांचा पूर्ण ताबा घेतला आहे. आता निष्ठावंत रांजणे यांना बँकेत येण्यापासून आ. शिवेंद्रराजे रोखतात की परळीत मेळावा घेवूनही आ. शशिकांत शिंदे यांना मदत करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सोसायटी मतदार संघात आ. शिंदे यांच्यापुढे एवढे कडवे आव्हान का उभे राहिले? याचे ठोकताळे राजकीय पटलावर सध्या बांधले जात आहेत. आ. शिंदे यांचे गणित नक्की चुकले कुठे? एवढी परिस्थिती निर्माणच कशी झाली? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राच्या कुठल्याही मतदार संघातून निवडून येण्याची एकेकाळी धमक असणार्या आ. शशिकांत शिंदे यांना स्वत:च्या कोरेगाव मतदार संघातच पराभवाची चव चाखावी लागली होती. तिथेही ते गाफीलच राहिले होते. आ. शिंदे यांनी कोरेगावच्या पराभवातून धडा घेतला असता तर जावली सोसायटीतून ते बिनविरोध निवडून गेले असते. मात्र येथेही ते गाफीलच राहिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आ. शिंदे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अधूनमधून खटके उडाले होते. जावलीवरील वर्चस्व वादातून भडकलेला हा वणवा परळी खोर्यातही पोहोचला होता. त्याचाही फटका आ. शशिकांत शिंदे यांना बसल्याचे सध्या दिसत आहे.
हेही वाचा :
पहा व्हिडिओ : वीज आली तीच दिवाळी