मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती उत्तम | पुढारी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती उत्तम

मुंबई ; पुढारी वृत्‍तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज (शुक्रवार) सकाळी सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्‍त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली.

या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती. आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. डॉ अजित देसाई हे हृदयरोगतज्ज्ञ असून डॉ. शेखर भोजराज हे स्पाईन सर्जन आहेत.

उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठदुखीचा त्रास होत होता. हा त्रास बळावल्याने त्यांना मानेवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक संपताच मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल झाले होते. शस्त्रक्रिया न करता हे दुखणे राहाते का यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र मानदुखी थांबत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे मान आणि खांद्याच्यामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

Back to top button