Latest

LSG vs RCB : बेंगलोर ‘लई भारी’

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा :  जोश हेझलवूडची लाजवाब गोलंदाजी आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस याने केलेली 96 धावांची अप्रतिम खेळी यांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने लखनौ सुपर जायंटस्वर 18 धावांनी आकर्षक विजय संपादला. आता पाच विजयांसह आरसीबीचे सात सामन्यांतून 10 गुण झाले आहेत. तेवढ्याच सामन्यांतून लखनौला 8 गुणांवर समाधान मानावे लागले आहे. लखनौचा कर्णधार लोकेश राहुल बाद झाला आणि तोच या लढतीला निर्णायक कलाटणी देणारा क्षण ठरला. (LSG vs RCB)

182 धावांचे आव्हान समोर ठेवून मैदानात उतरलेल्या लखनौला अखेर 8 गडी गमावून 163 धावाच करता आल्या. लखनौने सावध सुरुवात केली होती. सलामीवीर क्विंटन डी कॉक फार काळ टिकू शकला नाही. जोश हेझलवूडने त्याला 3 धावांवर टिपले. पाठोपाठ मनीष पांडे हाही हेझलवूडचाच बळी ठरला. त्यामुळे लखनौची अवस्था 2 बाद 33 अशी झाली होती. कर्णधार लोकेश राहुल याने मात्र एक बाजू भक्कमपणे लावून धरली होती. पहिल्या पाच षटकांत लखनौने सहाच्या आसपास धावगती राखली. विजयासाठी आवश्यक धावगती तेव्हा 10 हून जास्त झाली होती. (LSG vs RCB)

कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा या जोडीने वेगाने धावा जमवायला सुरुवात केली. मात्र, अंतिमतः त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. कृणालने 42 धावांची झटपट खेळी केली, तर हुड्डाने 13 धावा केल्या. जेसन होल्डरने 9 चेंडूंत दोन षटकारांसह 16 धावा केल्या; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आरसीबीकडून हर्षल पटेल महागडा गोलंदाज ठरला. त्याने 2 बळी मिळवले. अन्य सर्व गोलंदाजांनी संतुलित मारा केला. त्यामुळे लखनौच्या फलंदाजांना फटकेबाजीसाठी मोकळीक मिळाली नाही. जोश हेझलवूडने चार, तर महम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला. (LSG vs RCB)

त्यापूर्वी लखनौचा कर्णधार लोकेश राहुल याने नाणेफेक जिंकून आरसीबीला फलंदाजी दिली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 181 धावा केल्या. त्यांची सुरुवात अडखळतच झाली. सलामीवीर अनुज रावत याने केवळ चार धावा केल्या, तर विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. हे दोन्ही बळी दुष्मंथा चमीराने मिळवले. त्यावेळी फलकावर फक्त सात धावा लागल्या होत्या. कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. याला क्रिकेटच्या परिभाषेत 'गोल्डन डक' असे संबोधले जाते. आयपीएलमध्ये कोहली 'गोल्डन डक'वर बाद होण्याची ही चौथी वेळ होय. तसेच कोहली हा आयपीएलमध्ये सातव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. यंदा त्याने सात डावांत 19.83 च्या सरासरीने केवळ 119 धावा केल्या आहेत. (LSG vs RCB)

मात्र, त्यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी शानदार फलंदाजी केली. विशेषतः, मॅक्सवेलने जोरदार हल्लाबोल केला. 11 चेंडूंत त्याने 23 धावा कुटल्या. त्याची फलंदाजी बहरत आहे असे वाटत असतानाच त्याला कृणाल पंड्याने जेसन होल्डरच्या हाती झेल देणे भाग पाडले. फलकावर तेव्हा 44 धावा लागल्या होत्या. (LSG vs RCB)

गोवेकर सुयश प्रभुदेसाई मैदानात उतरला. त्याने 10 धावा केल्या. जेसन होल्डरने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. दुष्मंथाने सुरुवातीच्या दोन षटकांत 24 धावा मोजल्या खर्‍या; पण त्याने दोन महत्त्वाचे मोहरे टिपले. शाहबाज अहमदने चौकार ठोकून छान सुरुवात केली. बाराव्या षटकात आरसीबीने शंभर धावांचा टप्पा गाठला. दरम्यान, कर्णधाराला साजेशी खेळी करताना फाफ डू प्लेसिसने 96 धावा झोडल्या. त्याने 64 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व दोन षटकार हाणले. प्लेसिसने निर्धारपूर्वक केलेल्या खेळीमुळेच आरसीबीला समाधानकारक धावसंख्या गाठता आली. लखनौकडून चमीरा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2, तर कृणाल पंड्याने 1 गडी बाद केला. शाहबाज अहमद धावबाद झाला. (LSG vs RCB)

राहुल बाद आणि सामन्याला कलाटणी

कर्णधार राहुल 24 चेंडूंत 30 धावा करून बाद झाला. त्याने 3 चौकार व एक षटकार खेचला. मात्र, हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्याला ज्या प्रकारे पंचांनी बाद दिले तो निर्णय राहुलला पटला नाही. यष्टिरक्षक दिनेश कार्तिकने त्याचा झेल टिपला. राहुल तंबूत परतल्यावर आरसीबीच्या खेळाडूंनी जल्लोष केला; कारण तिथेच सामना लखनौच्या हातून निसटला. राहुल बाद झाला तोच या सामन्याला निर्णायक कलाटणी देणारा क्षण ठरला. (LSG vs RCB)

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT