रत्नागिरी : चुलत भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघांना ७ वर्षांचा सश्रम कारावास | पुढारी

रत्नागिरी : चुलत भावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघांना ७ वर्षांचा सश्रम कारावास

रत्नागिरी; प्रतिनिधी : अंदाजे साडे तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील वाडिलिंबू यथे बाजारातून सामान आणण्यासाठी गेलेले असताना दारुच्या नशेत चुलत भाऊ मनोहर महादेव गोरे (26, रा.वाडिलिंबू सापुचेतळे, लांजा) याला मारहाण केली. त्यानंतर गॅस सिलेंडवर त्याचे डोके आपटून त्याला चालत्या गाडीतून धक्‍का देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्या दोन चुलत भावांना न्यायालयाने मंगळवारी 7 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

कौस्तुभ रामचंद्र गोरे (34), रोहन भागेश गोरे (24, दोन्ही रा.वाडिलिंबू सापुचेतळे, लांजा, रत्नागिरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नात्याने एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. 14 सप्टेंबर 2018 रोजी हे तिघेही कौस्तुभ गोरेच्या चारचाकी गाडीतून (एमएच-08-आर-7132) दुकानातील सामान आणि रोहन गोरेचा सिलेंडर आणण्यासाठी लांजा येथे गेले होते. सर्व सामान घेतल्यानंतर तेथीलच एका दारुच्या दुकानात दारु पिऊन ते परतत होते.

ते पुनस येथे आले असता मनोहरने बिअरची बाटली कौस्तुभ आणि रोहनच्या अंगावर ओतली. याचा राग आल्याने कौस्तुभने गाडीतून खाली उतरत मनोहरला मारहाण केली व ते पुन्हा घरी जाण्यास निघाले. तेव्हा मनोहर याने कौस्तुभने घेतलेल्या धान्याच्या पिशव्या फोडल्या. त्यामुळे कौस्तुभने मनोहरला आगवे उभर्‍याचा टोणा येथे पुन्हा गाडी थांबवून मारहाण केली. पुढे सायंकाळी 4.30 वा.सुमारास आगरगाव पांढरा आंबा येथील वळणावर कौस्तुभने मनोहरला मारहाण करुन गाडीत ठेवलेल्या गॅस सिलेंडरवर त्याचे डोके जोरात आपटले. त्यामुळे मनोहरच्या डोक्याला गंभीर दुखापत करुन त्याला चालत्या गाडीतून ढकलून दिले.

डोंबिवली : रॅलीत सफाई कर्मचाऱ्यावर चाकूचे वार करणाऱ्यास अटक

त्यानंतर दोन्ही आरोपींनी अपघात झाल्याचा बनाव करुन पुरावा नष्ट केला. रस्त्यात जखमी अवस्थेत पडलेल्या मनोहरला आपण जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केल्याचा बनाव त्यांनी रचला होता. उपचारादरम्यान मनोहरचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करुन अधिक तपासासाठी लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. लांजा पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस निरीक्षक विलास गावडे यांनी संशयितांवर गुन्हा दाखल करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले हेाते. हा खटला न्यायालयात सुरु होता. सरकारी पक्षातर्फे 14 साक्षिदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे करण्यात आलेल्या युक्‍तिवाद ग्राह्य मानून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश शेख यांनी दोन्ही आरोपींना 7 वर्ष सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Back to top button