भूस्खलनाचाही अलर्ट; कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच यंत्रणा | पुढारी

भूस्खलनाचाही अलर्ट; कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच यंत्रणा

कोल्हापूर; अनिल देशमुख : जिल्ह्यात होणार्‍या भूस्खलनाचा आता अलर्ट मिळणार आहे. अशा घटनांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा जिल्ह्यात बसविण्यात येणार आहे. यासाठी मे महिन्यात पथक येणार आहे.

राज्यात विशेषत: कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात गेल्या वर्षी पावसाळ्यात भूस्खलनाच्या मोठ्या घटना घडल्या. यामध्ये जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली. या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने अशा घटनांबाबत उपाय योजना करण्यासाठी आयआयटी तज्ज्ञांचा समावेश असलेली समितीही स्थापन केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही गेल्या तीन वर्षांत अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या. जिल्ह्यात 2019 मध्ये कोल्हापूर-जोतिबा मार्गावरील रस्ता खचला. राधानगरी आणि गगनबावड्यात जमीन खचली. गेल्या वर्षी भूस्खलनाच्या घटनेत वाढ झाली.

कोल्हापूर-जोतिबा, कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर भूस्खलन झाले. कोल्हापूर-पन्हाळा रस्ता तर पूर्णपणे खचून गेल्याने आठ महिने बंदच आहे. गगनबावडा तालुक्यातही रस्ता खचला.

जिल्ह्यात गेल्या वर्षी भूस्खलनाच्या लहान-मोठ्या अशा तब्बल 80 घटना घडल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी डोंगराळ भाग आहे. यामुळे भूस्खलनाचा मोठा धोका आहे. भूस्खलनाच्या घटना वारंवार होऊ नये, त्यातून होणारी संभाव्य जीवित वा वित्तहानी टाळता येईल, यादृष्टीने अशा घटनांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा बसविण्याचा विचार आहे. याकरिता अशी यंत्रणा विकसित केलेल्या हिमाचल प्रदेशातील मंडी येथील ‘आयआयटी’ संस्थेचे पथक मे महिन्यात कोल्हापुरात येत आहे.

जिल्ह्यात पथदर्शी प्रयोग म्हणून दोन ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार आहे. ज्या ठिकाणी कमी मनुष्यवस्ती आहे, अशा ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. त्याचे निर्ष्कष आल्यानंतर जिल्ह्यातील भूस्खलन झालेल्या तसेच होणार्‍या संभाव्य ठिकाणी ही यंत्रणा बसवण्याचे नियोजन आहे.

जिल्ह्यातील सहाशे गावांत ‘पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम’

जिल्ह्यात पूरस्थितीसह आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेली ‘पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम’ आणखी 600 गावांत बसविण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील 331 गावांसह कोल्हापूर शहरात एकूण 615 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित आहे.

Back to top button