नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा आयपीएल २०२१ च्या हंगामातील सर्वांत चर्चेत असणारा खेळाडू आहे. आयपीएलच्या कालच्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (IPL2021 MIvsKKR) सामन्यात कोलकात्याने मुंबईचा ७ विकेट्सनी पराभव केला. केकेआरकडून सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५३) आणि राहुल त्रिपाठी (७४) यांनी मुंबईच्या गोलंदाजाची यथेच्छ धुलाई केली.
या सामन्यातील व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रत्येकजण त्याच्या फलंदाजीचे कौतुक करत आहे.
व्यंकटेश अय्यर याचा जन्म मध्य प्रदेशातील इंदौर शहरात झाला. व्यंकटेशचे वडील मानव संसाधन सल्लागर म्हणजेच ह्यूमन रिसोर्स कन्सल्टंट म्हणून आहेत. तर त्याच्या आईने अनेक वर्षे रुग्णालय व्यवस्थापनाचे काम पाहिले आहे.
व्यंकटेशचे कुटुंबीय दक्षिण भारतीय आहेत. त्याला घरातील लोकांनी शिक्षणापेक्षा खेळाकडे अधिक लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन दिले.
व्यंकटेशने त्याच्या यशस्वी क्रिकेट करियरचे क्रेडिट त्याच्या आईला दिले आहे. त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, जेव्हा माझ्या आईने मला पुस्तके वाचण्यापेक्षा बाहेर जाऊन खेळ असे सांगितले तेव्हापासून मी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.
अय्यर १९ वर्षापर्यंत क्रिकेट केवळ एक छंद म्हणून खेळत होता. त्याच्या मनात क्रिकेटमध्ये करियर करण्याचा विचार त्यावेळी नव्हता. त्याला खेळापेक्षा शिक्षणात जास्त आवड होती. त्याने चार्टर्ड अकाउंटसाठी बीकॉममध्ये प्रवेश घेतला. २०१६ मध्ये त्याने सीएची इंटरमीडिएट परीक्षा दिली.
मात्र, तोपर्यंत व्यंकटेशने मध्य प्रदेशच्या सीनियर टीममध्ये T२० आणि ५० षटकांच्या सामन्यांच्या खेळात पदार्पण केले होते. त्यानंतर व्यंकटेशने सीएचे शिक्षण सोडून एमबीएला प्रवेश घेतला. शिक्षणासोबत त्याचे मन क्रिकेटमध्ये लागले. घरातून खेळासाठी प्रोत्साहन तसेच कॉलेज व्यवस्थापनानेदेखील त्याला क्लास अटेंड करण्याची सक्ती केली नाही.
२०१८ मध्ये त्याला एका अकाउंटिंग फर्मने नोकरीचा ऑफर दिली. पण त्याला खेळ किंवा नोकरी यापैकी एकाची निवड करायची होती आणि त्याने क्रिकेटला निवडले.
व्यंकटेश २०१५ पासून मध्य प्रदेशकडून स्थानिक पातळीवर क्रिकेट खेळत आहे. रणजी ट्रॉफी पर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अधिक वेळ लागला नाही. २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफी हंगामासाठी त्याची निवड झाली. त्यानंतर २०२०-२१ मध्ये मध्य प्रदेशातील सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी त्याची निवड झाली.
त्याने या टूर्नामेंटमधील पाच डावांत मध्य प्रदेशसाठी २२७ धावा केल्या. व्यंकटेशने ७५.६६ च्या सरासरीने आणि १४९.३४ स्टाइक रेटने धावा केल्या. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाब विरुद्ध खेळताना १४६ चेंडूत १९८ धावा ठोकल्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये त्याचा दबदबा निर्माण झाला.
त्याच्या दमदार खेळीने केकेआरने त्याला IPL २०२१ च्या हंगामासाठी आपल्या संघात घेतले. पहिल्या सत्रात त्याला संधी मिळाली नाही. पण दुसऱ्या सत्रात व्यंकटेशच्या नशिबाने एक वेगळे वळण घेतले. आणि त्याला २० सप्टेंबरच्या रोजीच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. हा सामना रॉयल चॅलेजर्स बेंगलोर विरोधात होता. पहिल्या सामन्यात त्याने एक षटकार आणि सात चौकार ठोकत २७ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी केली.
२३ सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात व्यंकटेशने दमदार खेळी करत त्याच्या संघाला विजय मिळवून दिला. त्याने ३० चेंडूत ५३ धावा केल्या. या सामन्यात त्याने तीन षटकार आणि चार चौकार ठोकले.