कल्याण ; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच एका खासगी शिकवणी घेणार्या शिक्षकाने आठ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, बाजारपेठ पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे.
कल्याण पश्चिमेकडील एका उच्चभू्र सोसायटीत राहणारी आठ वर्षीय विद्यार्थिनी परिसरात राहणार्या खासगी शिकवणी घेणार्या शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होती. शिकवणी घेणारी शिक्षिका माहेरी गेल्याने या कालावधीत शिक्षिकेचा पती मुदर फकरुद्दीन तालवला (42) दीड महिन्यापासून शिकवणी घेत होता. काही दिवसापासून या आठ वर्षीय विद्यार्थिनीने शिकवणीला जाणे बंद केले.
आईने विचारणा केली असता प्रचंड भयभीत झालेली ही मुलगी रडू लागली. आईने मग विश्वासात घेत विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार आईला हावभाव करुन दाखविला. काय घडले ते आई समजून गेली. आईने मुलीला घेऊन पोलिसांशी संपर्क साधत बाजारपेठ पोलिसांना शिक्षकाने विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सांगितला.
बाजारपेठ पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर शिक्षक मुदर तालवाला यास अटक केली आहे. न्यायालयाने या नराधमास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याचे बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.