पुढारी महाराष्ट्राचा बेस्ट वृत्तपत्रीय ब्रँड | पुढारी

पुढारी महाराष्ट्राचा बेस्ट वृत्तपत्रीय ब्रँड

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमात ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमतर्फे देण्यात येणारे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यशस्वी उद्योजक, विविध क्षेत्रांतील कलाकार तसेच कोरोना योद्ध्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी दै. पुढारी ला ‘महाराष्ट्रातील बेस्ट वृत्तपत्रीय ब्रँड’ म्हणून गौरवण्यात आले. दै. ‘पुढारी’चे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमाला इजिप्‍तचे मुंबईतील वाणिज्यदूत एतिया अबू एल्नागा, बांगला देशचे मुंबईतील उपउच्चायुक्‍त मोहम्मद लूतफोर रहमान, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, डॉ. योगेश दुबे आदी उपस्थित होते.

या पुरस्कार सोहळ्यात प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक विठ्ठल कामत, शास्त्रीय गायक राहुल देशपांडे, टाइम्स ऑफ इंडियाचे डोमा साई, महिला उद्योजिका स्वाती मुजुमदार, व्हीआयपी गारमेंटचे व्यवस्थापकीय संचालक कपिल पाठारे, ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

निरंतर जागरूकता ठेवल्यास कोरोनावर मात शक्य : राज्यपाल

कोरोना संसर्गाने केवळ भारतालाच नाही, तर सर्व जगाला ग्रासले आहे. विविध देशांमध्ये आर्थिक वर्चस्वासाठी शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू असताना कोरोनाने सर्व जगाला एक होऊन संसर्गाशी एकत्रितपणे लढण्यास प्रवृत्त केले आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. अशावेळी सर्वांनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले, तसेच निरंतर जागरूकता व जबाबदार वर्तन ठेवले, तर कोरोनासारखी कितीही संकटे आली तरीही त्यांचा धैर्याने सामना करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.

भारताने एकेकाळी जगाचे आध्यात्मिक नेतृत्व केले आहे. बौद्ध धर्माची निर्मिती याच भूमीत झाली आणि त्याचा जगभर प्रचार झाला. विश्‍वबंधुत्व ही भारताची शिकवण असून, जगाला आज महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने जाण्याची गरज असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.

Back to top button